या प्रकारामुळे विविध भागांतून पालखी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांतून नाराजी व्यक्त होत होती.
हातकणंगले : आळते (ता. हातकणंगले) येथे श्री रेणुका देवी यात्रेत (Renuka Devi Yatra) पालखी सोहळा सुरू असतानाच जोगत्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीत काठी व दगडांचा वापर झाला. त्यात दोघे जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
हा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा पालखी गावात पोहोचल्यानंतर मंदिर परिसरात पोलिसांसमोरच घडला. त्याने प्रचंड गोंधळ उडाला. पोलिसांनी (Hatkanangale Police) हस्तक्षेप करत दोन्ही गटांसह भाविकांना पांगवले. दरम्यान, गंभीर जखमीपैकी एकाचा मृत्यू झाल्याची अफवा होती. त्यामुळे पोलिसांची मध्यरात्री तारांबळ उडाली. याबाबत हातकणंगले पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंद नाही. हे प्रकरण आपापसात मिटवल्याचे समजते.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आळते (ता. हातकणंगले) येथील श्री रेणुका देवीची यात्रा व पालखी सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री झाला. एकीकडे पालखी सोहळा सुरू असताना दुसरीकडे मंदिर परिसरातील वादामुळे यात्रेला गालबोट लागले. मध्यरात्री बारानंतर विविध धार्मिक विधी होतात. त्यामुळे भाविक शक्यतो रात्री मुक्कामाला असतात.
यात्रेत कांकण फोडणे सोहळा व पालखी सोहळ्याला विषेश महत्त्व असते. रात्री उशिरा देवीची पालखी निघाली. पालखी गावात पोहोचल्यानंतर गावाबाहेर असणाऱ्या मंदिरात दोन गटांत किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. जमा झालेला नैवेद्य फेकून दिल्याने तो अस्ताव्यस्त पसरला होता. दोन्ही गटांकडून काठी व दगडाने मारहाण झाली. हाणामारीत प्रमुख दोघांना हेरून मारहाण करण्यात आली. एकास डोक्याला जबर मार लागला. अचानक झालेल्या हाणामारीमुळे भाविकांची पळापळ सुरू झाली. व्यावसायिकांनी घाबरून दुकाने पटापट बंद केली.
हाणामारीचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, एकमेकांच्या हद्दीत घुसखोरी करायची नाही, असा अलिखित नियम आहे. त्यावरून किंवा पूर्ववैमनस्यातून हाणामारी झाल्याची घटनास्थळी चर्चा आहे. हाणामारीच्या घटनेचे गांभीर्य ओळखून हातकणंगले व पेठवडगाव पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली होती. हाणामारीबाबत हातकणंगले पोलिसांनी सांगितले, की किरकोळ वाद झाला आणि तो मिटला आहे. आज दिवसभर आळते यात्रास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
या प्रकारामुळे विविध भागांतून पालखी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांतून नाराजी व्यक्त होत होती. वादाचे गालबोट लागल्याने मंगळवारी मध्यरात्री निघालेली पालखी बुधवारी पहाटे मात्र चार वाजता मंदिरात पोहोचली. त्यावेळीही मोठा बंदोबस्त होता.
दरवर्षी यात्रेला येणाऱ्या सर्व जोगत्यांना मंदिरात बोलावून घेऊन पुन्हा वाद करायचा नाही; अन्यथा यापुढे यात्रेत येऊ देणार नाही, अशी भूमिका आळते ग्रामपंचायत व श्री रेणुका देवीचे पुजारी यांनी घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.