खासदार धैर्यशील माने यांनी उदगावात असलेल्या बायपास मार्गावरून बदल प्रस्ताव तयार करून प्राधिकरण विभागाकडून मंजूर करून घेण्याचा निर्णय घेतला.
जयसिंगपूर : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग (Ratnagiri-Nagpur National Highway) अशा अंकली-उदगाव ते जैनापूरपर्यंत नव्याने जमिनी हस्तांतर होणार आहेत. त्याऐवजी जुन्या सांगली-कोल्हापूर बायपास मार्गानेच राष्ट्रीय मार्ग करा. शिवाय नव्या मार्गाच्या भरावामुळे उमळवाड, कोथळी परिसरातील गावे महापुरात (Flood) पाण्याखाली जाणार आहेत. त्यामुळे जुन्या मार्गानेच नवा मार्ग करावा, अशी मागणी उदगाव, उमळवाड, कोथळी परिसरांतील शेतकऱ्यांनी केली.
खासदार धैर्यशील माने (MP Dhairyasheel Mane), प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी विवेक काळे यांनी उदगाव येथे असलेल्या बायपास मार्गावरून बदल प्रस्ताव तयार करून प्राधिकरण विभागाकडून मंजूर करून घेण्याचा निर्णय घेतला.
उदगाव येथे चोकाक ते उदगावदरम्यान होणाऱ्या महामार्गाच्या कामकाजाबाबात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार माने, श्री. पंदरकर, श्री. काळे यांनी आढावा बैठक घेतली. महामार्गामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उदगाव येथील सहा अभियंत्यांनी जुन्या बायपास मार्गावरून कसा मार्ग होऊ शकतो, तो केल्यास पुराचा धोका टळतो, शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येते, याची माहिती ले-आऊटमधून दिली.
शेतकरी अरुण मगदूम, सुदर्शन मगदूम, दीपक नकाते, रामचंद्र बंडगर, सन्मती मगदूम, दादासाहेब कोळी, राजेंद्र मगदूम आदींनी उदगावमध्ये सांगली-कोल्हापूर मार्गासाठी आता तिसऱ्यांदा जमीन जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे होणारा मार्ग बायपास मार्गानेच करावा, अन्यथा महामार्गाचे काम होऊ देणार नसल्याचे सांगितले.
खासदार धैर्यशील माने यांनी प्रकल्प संचालक यांना तयार केलेल्या नकाशा रचनेत बदल करण्यासाठी तत्काळ वरिष्ठांना या बाबी सांगून नव्याने उदगाव भागात होणाऱ्या मार्गाची नव्याने मंजुरी घ्यावी, यासाठी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ही बाब पटवून देऊन त्यांच्याकडूनही याची मंजुरी मिळवून देणार असल्याचे सांगितले. नायब तहसीलदार योगेश जमदाडे, युवासेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे, भैरू हंकारे, रमेश मगदूम, पोलिस पाटील अनुराधा कांबळे, दिलीप कांबळे, अविनाश चौगुले आदी उपस्थित होते.
जैनापूर येथील बेघर, १२९ व ४९६ गट क्रमांक, शेत व सर्व्हिस रोड, तसेच होणाऱ्या मार्गाची माहिती प्राधिकरण विभागाने शेतकऱ्यांना द्यावी. अन्यथा रस्ता होऊ देणार नाही. तसेच आम्हाला चौपट दर दिला पाहिजे, यांसह अनेक मागण्या मांडल्या. राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील, सरपंच संगीता कांबळे, सन्मती पाटील आदी उपस्थित होते.
तमदलगेला जादा गायरान असून, बागायत शेती कमी आहे. होणारा मार्ग गायरान जमिनीतून न्या. त्यामुळे गाव वाचेल, शेतीचे नुकसान होणार नसल्याचे सांगितले. ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन होत नाही तोपर्यंत पुढील काम थांबवा, असे आदेश खासदार धैर्यशील माने यांनी दिले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे, सुधाकर खोंद्रे, राजकुमार आडमुडे, राजगोंडा पाटील, अमोल कोळी, अभिजित वझे, सरपंच धनाजी नंदिवाले, तसेच उपसरपंच पुरुषोत्तम शिरसट उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.