गडहिंग्लज (कोल्हापूर) : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज (Suger Factory Gadhinglaj) तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) 12 संचालकांनी आज राजीनामे दिले. अध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामे देत असल्याचे नमूद केले आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. एस. एन. जाधव (S.N.Jadhav)यांच्याकडे त्यांनी राजीनामे सोपविले आहेत. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
राजीनामा दिलेल्यामध्ये डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, सतीश पाटील, विद्याधर गुरबे, दीपक जाधव, प्रकाश पताडे, अनंत कुलकर्णी, सुभाष शिंदे, सदानंद हत्तरकी, किरण पाटील, जयश्री पाटील, क्रांतीदेवी कुराडे यांचा समावेश आहे. संचालकांच्या सामुहिक राजीनामास्त्राने कारखान्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, या राजीमान्यासंदर्भात कारखाना स्तरावर योग्य ती कार्यवाही सत्वर करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश साखर सहसंचालकांनी दिले आहेत.
गडहिंग्लज साखर कारखाना ब्रिस्क कंपनीने मुदतीपूर्वीच दोन वर्षे सोडला. त्यानंतर कारखाना स्वबळावर आणि चालविण्यास देणे अशा दोन्ही पातळीवर प्रयत्न सुरु होते. अखेर स्वबळावर कारखाना सुरु करण्यात आला. पण, गळीत हंगामास विलंब झाला. याच घडामोडीत अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आठ तर विरोधातील बारा असे संचालकांत दोन गट पडले आहेत. दोन्ही गटात गेल्या काही दिवसापासून आरोप-प्रत्यारोप सुरु होते. हे प्रकरण आता बारा संचालकांच्या राजीनाम्यापर्यंत पोचले आहे.
कारखान्याच्या अध्यक्षांनी संचालकांना विश्वासात न घेता, कारखान्याची बिकट आर्थिक परिस्थिती का आली याचे विश्लेषण न करता, तसेच फायदे-तोटे विचारात न घेता कारखाना विलंबाने सुरु केला आहे. संचालकांच्या सभेतील उपस्थितीदाखल केलेल्या सह्यांचा वापर करुन बेकायदेशीर ठराव करुन मनमानी कारभार सुरु आहे. सभासदांचा ऊस न आणता कर्नाटकातून बिगर रिकव्हरीचा ऊस आणला जात आहे. अध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे कारखाना तोट्यात जात आहे. केवळ राजकीय व आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी कारखाना घाईगडबडीत सुरु केला आहे. यापूर्वी अशाच कारभारामुळे संचालकांना सहकार कायदा कलम व फौजदारी गुन्ह्यास सामोरे जावे लागले आहे. पुन्हा त्याच दुष्टचक्रातून जावे लागू नये, म्हणून राजीमाने देत असल्याचे बारा संचालकांनी नमूद केले आहे.
साखर विक्री निर्णय पूर्ण कोरमच्या सभेतच
गडहिंग्लज कारखान्याचे अध्यक्ष बेजबाबदार व मनमानी कारभार करीत आहेत. संचालक मंडळाला विश्वासात न घेता, रितसर सभा न घेता साखर विक्रीसाठी टेंडर मागविली आहेत. आम्ही अध्यक्षांच्या मनमानी कारभाला कंटाळून संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे साखर विक्री थांबविण्याची मागणी राजीमाना दिलेल्या बारा संचालकांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली होती. त्या अनुषंगाने साखर विक्रीबाबतच्या टेंडरवरील निर्णय व अन्य धोरणात्मक निर्णय संचालक मंडळाच्या पूर्ण कोरम असलेल्या सभेतच घेऊन पुढील कार्यवाही करण्याची सूचना प्रादेशिक साखर सहसंचालकांनी कारखान्याला दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.