निपाणी : यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याच्या मागणीसाठी श्री गणेशोत्सव महामंडळाचा नेतृत्वाखाली शहरातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका, पोलिस आणि तहसीलदारांना निवेदन दिले होते. उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी देण्याच्या मागणीसाठी अल्टिमेटमही दिला होता.
पण प्रशासनाने आजतागायत कोणताच निर्णय न दिल्याने 'आमचा उत्सव आमची जबाबदारी' हे ब्रीद वाक्य ठेवून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार रविवारी (ता. 29) सायंकाळी झालेल्या विविध मंडळांच्या बैठकीत झाला. महामंडळाचे निवास चव्हाण यांनी, गणेश उत्सव 10 दिवसावर येऊनही प्रशासनाने आजतागायत परवानगी दिलेली नाही. प्रत्येक सार्वजनिक उत्सव मंडळांनी कोरोनासह प्रशासनाचे नियम पाळून मूर्ती प्रतिष्ठापना करून हा उत्सव साजरा करावा.
कोणत्याही मंडळाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्यास महामंडळाचे पदाधिकारी त्यासाठी कटिबद्ध आहेत. त्याशिवाय प्रत्येक सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकसंघ राहून हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. अॅड. निलेश हत्ती म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत शासनाची बैठक सोमवारी (ता.३०) होणार आहे. त्यांनी परवानगी नाकारली तरीही सर्व सार्वजनिक मंडळांनी नियम पाळून उत्सव साजरा करावा.
गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. सर्वांची वज्रमूठ एकत्र ठेवल्यास गणेश उत्सव साजरा होणार आहे. शासन गैरकृत्याला परवानगी देत असून केवळ हिंदू धर्मावरील सणावर बंदी घालत आहे. ही दुर्दैवाची गोष्ट असून कोणावरही गुन्हे दाखल झाल्यास सर्वप्रथम गणेशोत्सव महामंडळ जबाबदारी घेईल. काही दिवसापासून राजकीय नेते महामंडळांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असून त्याला कोणीही बळी पडू नये.
प्रथमेश पाटील यांनी, गेल्या दोन वर्षापासून हिंदू धर्मावरील सणांना आडकाठी आणली जात आहे. त्यामुळे उत्सव आपला असून धर्मावर मोठे संकट आले आहे. त्यामुळे सर्वांनी प्रशासनाचे नियम पाळून हा उत्सव साजरा करावा. माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, श्रेयश आंबले, अक्षय खोत यांनीही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नगरसेवक संजय पावले यांच्यासह शहर आणि उपनगरातील सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फलकाचे अनावरण
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या उत्सवाच्या परवानगीसाठी निवेदने देऊनही त्याकडे राजकीय व प्रशासकीय मंडळाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे 'गणेशोत्सव नाही तर मतदान नाही,' सर्व कार्यक्रमांना गर्दी चालते, मग उत्सवाला का नको, यासह विविध असे लिहिलेल्या फलकाचे अनावरण येथील कोठीवाले कॉर्नरवर करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.