कोल्हापूर : राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना सहाव्यांदा 31 मार्चपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश आज राज्य शासनाने काढले. या निर्णयाने जिल्ह्यातील गोकुळसह जिल्हा बॅंक, राजाराम कारखान्यासह सुमारे एक हजार संस्थांची प्रक्रिया थांबणार आहे. ज्या टप्प्यावर प्रक्रिया सुरू आहेत, त्या टप्प्यावरच स्थगिती देण्यात आल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा खेळखंडोबा सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे यासंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे. "गोकुळ' ची प्रारूप यादी प्रसिध्द होऊन त्यावर हरकत दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता तर जिल्हा बॅंकेची ठराव संकलनाची प्रक्रिया कालच संपली असून यादी तयार करण्यासाठी हे ठराव जिल्हा बॅंकेकडे सुपुर्द करण्यात आले आहेत. तोपर्यंत या निवडणुकांना 31 मार्च 2021 पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. "गोकुळ' व जिल्हा बॅंकेसह राजाराम कारखान्याच्या विद्यमान संचालकांची मुदत गेल्यावर्षीच संपली आहे. "दत्त-आसुर्ले' व शरद-नरदे या दोन कारखान्यांच्या निवडणूक कार्यक्रमाचीही घोषणा दोन दिवसांपुर्वी झाली आहे. संचालक मंडळाची मुदत गेल्यावर्षी संपलेल्या बहुंताशी साखर कारखाने व संस्थांची प्रक्रिया सुरू होती, आता ही प्रक्रिया थांबवावी लागणार आहे.
गेल्या आठवड्यापासून राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन दिवसांपुर्वीच जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात सभा, समारंभ, आंदोलने, यात्रांना पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे. या पार्श्वभुमीवर राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत सहकारी संस्थांच्याही निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सहकार विभागाने या निवडणुकांना स्थगिती देत असल्याचा आदेश सायंकाळी काढला.
या नव्या आदेशामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा खेळखंडोबा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन महिन्यात तीनवेळा स्थगिती उठवली आणि पुन्हा प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रक्रिया सुरू करण्यासाठीची जाहीरातीवरील संस्थांचा खर्च पाण्यात गेला आहे. हजारो रूपये खर्चुन या जाहिराती दिल्या जातात. हा नाहक भुर्दंड या खेळखंडोबामुळे संस्थांवर पडणार आहे.
या तारखांना दिली स्थगिती
पहिल्यांदा 18 मार्च 2020 रोजी निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर 17 जून 2020, 28 सप्टेंबर 2020, 31 डिसेंबर 2020, 16 जानेवारी 2020 रोजी या निवडणुकांना प्रत्येकवेळी तीन महिन्यांची स्थगिती देण्यात आली. आज सहाव्यांदा पुन्हा 31 मार्च 2021 पर्यंत स्थगिती देण्यात आली.
शरद, आसुर्लेची प्रक्रियाही थांबणार
पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथील दत्त साखर कारखाना व हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद कारखान्यासाठी 28 मार्च रोजी मतदान होणार होते. 22 फेब्रुवारीपासून या दोन कारखान्यांसाठी अर्ज भरण्याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. पण नव्या आदेशाने या निवडणुकाही स्थगित होतील.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.