कोल्हापूर : शाळा व व्यावसायिक, कृषी शिक्षण देणाऱ्या संस्था, महाविद्यालय, वसतिगृह सुरू करून सामान्य लोकांसाठी शिक्षणाची दारं छत्रपती शाहू महाराजांनी खुली केली आणि छत्रपती राजाराम महाराजांनी त्या संकल्पनेला विस्तारित करून कोल्हापूर राज्यात ७७२ संस्थापर्यंत नेली. १९२२ मध्ये ५५९ शाळांत ३१०९६ इतकी असलेली संख्या १९४० मध्ये ८६५ शाळांत ६२७८६ विद्यार्थ्यांवर पोचली. दरबारमधून साडेसात लाख रुपये खर्च फक्त शिक्षणासाठी होत होता. साईक्स लॉ कॉलेज व महाराणी ताराबाई टीचर्स कॉलेजची निर्मिती केल्याने शैक्षणिक वारसा सुरू झाला. ही इमारत याची साक्ष राहिल्या.
१९३३ मध्ये साईक्स लॉ कॉलेज आणि १९३४ मध्ये महाराणी ताराबाई टीचर्स कॉलेज छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत सुरू झाले.दुमजली असलेल्या या इमारतीचे मंडपासह प्रवेशद्वार दक्षिणेकडे असून, दगडी बांधकाम असलेल्या या इमारतीला बाहेर खांब, व्हरांडा, प्रवेश मंडपाची कमान आणि शिक्षणाच्या दृष्टीने भरपूर प्रकाश व खेळती हवा, असे सुंदर वातावरण लाभले होते. खेळाचे मैदान म्हणून तीन एकर जागा येथून जवळ (सध्याचे लॉ कॉलेज मैदान) देण्यात आली होती.
१७ जून १९३३ रोजी मुंबई प्रांताचे तत्कालिन गव्हर्नर सर फ्रेडरिक साईक्स यांच्या हस्ते उद्घाटन करून त्यास साईक्स लॉ कॉलेज असे नामकरण करण्यात आले.शिक्षकांना प्रशिक्षण देणारी पहिली संस्था कोल्हापुरात १८६७ मध्ये स्थापन झाली. हे फक्त पुरुषांसाठी कॉलेज असल्याने १८८२ मध्ये स्त्रियांसाठी वेगळे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. त्यानंतर रुकडी येथे प्रशिक्षण केंद्र व १९१२ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी सहा महिन्यांचा नवा अभ्यासक्रम सुरू केला.
शिक्षकांच्या प्रशिक्षणाबाबत संस्थान खूपच सजग होते. म्हणूनच सर्व शिक्षण संस्थांमध्ये दर्जा उंचावण्यास मदत झाली.महाराणी ताराबाई टीचर्स कॉलेजमध्ये प्रशिक्षित शिक्षक पदवी घेवून बाहेर पडल्याने शिक्षणाचा दर्जा बदलला. ‘बॅचलर ऑफ टीचिंग’ या पदवीमुळे ‘बी. टी. कॉलेज’ असे नाव रूढ झाले. पुढे याच ठिकाणी मास्टर डिग्रीचे शिक्षण घेता येऊ लागले. शाहूपुरी आणि राजारामपुरी याच्या मधला हा भाग आज साईक्स एक्सटेंशन म्हणून ओळखला जातो. केडीसी बॅंक समोर आणि पाच बंगल्यांच्या मागे ही भव्य इमारत आपले लक्ष वेधून घेते. ती शैक्षणिक वारसा सांगणारी वास्तू म्हणून वारसा आणि शैक्षणिक मूल्ये जपून कायम राहील, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.