कोल्हापूर : शिक्षणाच्या बाबतीत मुस्लिम समाजात अनास्था असलेल्या काळात, छत्रपती शाहू महाराज १९०२ मध्ये इंग्लंडचा दौरा करून परत आल्यावर आनंद व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुस्लिम समाजातील पुढाऱ्यांनी शैक्षणिक चळवळ उभारावी, संस्था स्थापन कराव्या, त्यास दरबारकडून पूर्ण साहाय्य मिळेल, असे महाराजांनी सांगितले. त्यानंतर दसरा चौकात सुरू झालेले मुस्लिम बोर्डिंग हे आज शैक्षणिक वारसास्थळ ठरले.
१८ एप्रिल १९०१ रोजी व्हिक्टोरिया या मराठा बोर्डिंगमध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. त्यापैकी एका मुलास राजाराम कॉलेजमधून पदवी मिळाल्यानंतर त्याला महाराजांनी मामलेदारपद दिले. १९०६ मध्ये स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिम समाजातील पुढाऱ्यांना बोलवून शिक्षण प्रसारासाठी सोसायटी करण्याचा प्रस्ताव मांडला.
१५ नोव्हेंबर १९०६ ला किंग एडवर्ड मोहामेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. महाराज स्वतः पहिले अध्यक्ष झाले. सोसायटीने मुस्लिम बोर्डिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला. संस्थेने ११३४ रुपये निधी उभा केला. संस्थेला महाराजांनी चौफाळ्याच्या माळावरील (सध्याचा दसरा चौक) २५,००० चौरस फूट जागा दिली.
महाराजांचे गुरू फ्रेजरसाहेब यांच्या हस्ते बोर्डिंगची पायाभरणी झाली. महाराजांनी इमारतीसाठी ५,५०० रुपये देणगी दिली. शिवाय संस्थानकडील जंगल उपजाचे लाकूड देऊन इमारत उभी केली. दुमजली कौलारू इमारतीमध्ये मध्यावरती हॉल असून, इतर दोन्ही बाजूला खोल्या व इतर दालने आहेत. दक्षिण हद्दीलगत नवी इमारत बांधून नेहरू उर्दू मराठी हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज सुरू आहे. त्यासमोर प्रशस्त पटांगण आहे.
पश्चिम बाजूला बिंदू चौकातून दसरा चौकाकडे येणारा रस्ता आहे; मात्र प्रवेशद्वारामध्ये उभारलेले जाहिरात फलक, फेरीवाले, िवक्रेते आणि पार्किंगच्या गराड्यात ही महत्त्वाची वास्तू हरवली आहे असे वाटते. तिला मोकळं केलं पाहिजे.वारसा वास्तूचा अर्थ समजून घेतला तर जाहिरातीला अर्थ उरत नाही, हे लक्षात घेऊन छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक ऐक्याची रुजवण घालणाऱ्या या वास्तूला महाराजांच्या पुतळ्याची नजर बनवले पाहिजे.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.