कोल्हापूर : पूर्वी मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या दक्षिण महाराष्ट्रातील महाविद्यालयासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, ही संकल्पना १९२२ ते १९४० दरम्यान राजाराम कॉलेजला प्राचार्य असलेल्या डॉ. बाळकृष्ण यांनी छत्रपती राजाराम महाराज यांच्यापुढे मांडली होती. ती खूप दूरगामी विचारांची, स्थानिक संदर्भास धरून असलेली, विकासाभिमुख अशी होती. छत्रपती शिवाजी विद्यापीठ या नावाने १८ नोव्हेंबर १९६२ मध्ये त्याला मूर्त स्वरूप आले. भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
३४५.६० हेक्टर क्षेत्रावर विद्यापीठ उभारण्याचे काम सुरू होण्यापूर्वी ते ओपल हॉटेलच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागे उभी असलेली दगडी इमारत तशी अलीकडच्या काळात बांधली असली तरीही कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपरेला सुसंगत ठरेल अशी कमानीची रचना दर्शनी, दोन्ही बाजूला दोन घुमट जिन्याच्या भागावर आहे. प्रवेशद्वाराच्या मंडपावर विद्यापीठाचा ध्वज आणि त्याच दरम्यानच्या वरच्या भागात पुन्हा एक मोठा घुमट आहे.
इमारतीच्या मध्यभागी चौक असून, त्यामागे सिनेट सभागृह आहे. चारही बाजूवर प्रशासकीय अधिकारी, कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव कार्यालय आहे. छत्रपतींच्या पुतळ्यासह सुंदर उद्यान आहे. डाव्या बाजूला ग्रंथालयाची इमारत व त्यासमोर बगीचा, मागील बाजूस दीक्षांत समारंभासाठीचे सभागृह आहे. इतर विभागाच्या इमारती परिसरात आहेत. सुरवातीला रत्नागिरी, सोलापूर यासह सांगली, सातारा, कोल्हापूर अशा पाच जिल्ह्यांतील ३३ महाविद्यालये व एक संशोधन संस्था यामधील चौदा हजार विद्यार्थी व पाच पदव्युत्तर विभाग यांचा समावेश यामध्ये होता. आज २८३ महाविद्यालयातील तीन लाखांहून अधिक विद्यार्थी ३९ पदवी अभ्यासक्रमासाठी शिकत आहेत.
‘कमवा व शिका’ ही महत्त्वाची योजना गरीब व होतकरू मुलांना शिकण्यासाठी सुरू करून १९६७-७० या कालावधीत ६५ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून विद्यार्थी भवन उभे राहिले. यामध्ये शेती, पीठ गिरणी, वाचनालय, मुद्रणालय, अभ्यासिका या ठिकाणी अंशकालीन काम करून विद्यार्थी शिकण्याची परंपरा कायम राहिली असून, हा या विद्यापीठाचा कणा आहे.प्रशासकीय इमारत, ग्रंथालय, वसतिगृह, विविध विद्याशाखांच्या स्वतंत्र इमारती व प्रयोगशाळा, निवासस्थाने, मैदान, प्रेक्षागृह, सभागृह, कॅन्टीन असा विस्तार झाला आहे.
ग्रंथालयात चार लाख मुद्रित ग्रंथ असून, २९८ संशोधन पत्रिका सात हजार ई जनरलसाठी जोडले गेले आहे. ६३ पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठ व संशोधन संस्थाबरोबर करार करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधात्मक कामे व अध्ययन केले जाते. विद्यापीठाच्या परिसराला पाण्याची कमतरता भासू नये म्हणून छतावरील पाण्याचे संकलन, भुनर्भरण करून नव्याने दोन तलाव व विहिरीची निर्मिती करून आज विद्यापीठ पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले ही महत्त्वाची बाब आहे.
पश्चिम घाटातील वनस्पतींचे संवर्धन करण्यासाठी बोट्यानिकल गार्डनची निर्मिती आणि मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केल्याने जैव विविधता संपन्नतेचा उत्तम परिसर विकसित होत आहे. तो शहराच्या दृष्टीने नैसर्गिक वारसा ठरला आहे.विद्यापीठ किती जुने आहे, यावरून ते वारसास्थळ ठरले नसून ग्रामीण भागातील, अशिक्षित कुटुंबातील अनेक मुले-मुली सामान्य परिस्थितीतून येऊन इथे शिकली. माजी विद्यार्थी म्हणून ओळखले जाणारे आणि जगभर सर्व क्षेत्रात आज आपल्या कर्तृत्वाने कार्यरत असलेल्यांना घडवणारी ही वास्तू आहे. तशी ती इथला वारसा जगभर पोचवणारी वास्तू आहे. विद्यापीठाचे नाव, परंपरा, परिसर हे सर्वच वारसा म्हणून जपले गेले पाहिजे. अनावश्यक बाबी टाळून व्यवस्थापन व विस्तार करताना वारसामूल्य जपली पाहिजेत.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.