इचलकरंजी - आषाढी वारीच्या निमित्ताने विविध ठिकाणांहून अनेक पायी दिंडी जात आहेत. पण इचलकरंजीतील सचिन बुरसे या धावपट्टूने सलग १४ तास धावत तब्बल १०० किलोमिटरची आपली पहिली `रन`वारी पूर्ण करीत वेगळ्या पध्दतीने विठ्ठलाच्या चरणी आपली भक्तीभाव अर्पण केला.
सचिन हा धावपट्टू आहे. दोन वर्षापूर्वी नित्य व्यायामाला सुरुवात केल्यानंतर धावण्यामध्ये आवड निर्माण झाली. त्यानंतर पळण्याचा सराव सुरु केला. त्यानंतर हळू-हळू विविध मॅरेथॉन स्पर्धामध्ये सहभाग घेण्यास त्यांने सुरुवात केली. त्याची पहिली मॅरेथॉन स्पर्धा सातारा येथे झाली. त्यामध्ये २१ किलो मिटर अंतर १ तास ५६ मिनिटात पूर्ण करीत सुवर्ण पदक पटकाविले. त्यानंतर विविध मॅरेथॉन स्पर्धेत यश मिळत गेले.
उदय मेटे व कपिल चौगुले यांचे त्याला नेहमीच मार्गदर्शन मिळत राहिले. याशिवाय युएफसी ग्रुप, मॉर्निंग वॉक ग्रुप, भरत फिटनेस क्लब, इचलकरंजी रनर्स यांचे त्याला सतत सहकार्य मिळत आहे. एकिकडे मॅरेथॉन स्पर्धांचा प्रवास सुरु असतांना दोन महिन्यांपूर्वी `रन`वारी करण्याचा विचार सचिनच्या मनात आला. त्यानंतर त्यांने दररोज दोन तास सराव सुरु केला. प्रत्येक रविवारी लाँग रन सुरु केली. ५० किलो मिटरची एक लाँग रन पूर्ण केली.
आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर सचिनने `रन`वारी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिरढोण (जि.सांगली) येथून रात्री आठ वाजता पहिल्या `रन`वारीस प्रारंभ केला. सुरुवातीला सोबत सहकारी मित्र होते. नंतर एकटाच धावत असल्यामुळे सकाळ कधी होणार याची आस लागली होती. वातावरणातील उष्मा त्रासदायक ठरत होता. पण त्यावर मात करीत सकाळी १० वाजता पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला प्रदशिक्षा घालून सचिनने नामदेव पायरीवर नतमस्तक होत `रन`वारी पूर्ण केली.
पहिली `रन`वारी पूर्ण करण्यासाठी सचिनला राहूल शिरसाट, जयदीप गुरव, प्रणव पाटील यांचे सहकार्य मिळाले. वातारणातील उष्मा कांहीसा त्रासदायक ठरला. सांगोले येथे पोहचल्यानंतर घामांमुळे कपडे, बुट ओले झाले होते.
त्यामुळे त्रास होत होता. त्यासाठी कपडे व बुट बदलून पून्हा धावण्यास सुरुवात केली. थोडे अंतर राहिल्यानंतर उष्मा जास्त त्रासदायक ठरु लागल्यामुळे थांबण्याचा विचार मनात आला होता. मात्र जबर इच्छाशक्ती थांबू देत नव्हती. त्यामुळे पायांनी गती मिळत गेल्याचे सचिनने सांगीतले.
पहिलीच ही माझी `रन`वारी होती. ही `रन`वारी करतांना जरी शारिरीक त्रास सहन करावा लागला असला तरी मानसिक समाधान मोठे मिळाले. दरवर्षी असा उपक्रम राबविणार आहे. या `रन`वारीत माझ्यासोबत कोणाला इच्छा असेल तर येवू शकता.
- सचिन बुरसे, धावपट्टू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.