सेनापती कापशी : कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरातच बसा, हा संदेश. त्यांनी पाळला आणि निसर्ग प्रेमही जोपासले.
17 वर्षांपूर्वीचे वर्गमित्र जमले आणि त्यांनी लॉकडाउनमध्ये "सिडबॉल ते वृक्षारोपण' हा उपक्रम राबविला. काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथील हे पुणे, मुंबई आणि अन्य शहरात काम करणारे अभियंता, शिक्षक आणि शेती करणारे हे मित्र आहेत.
मार्चपासून लॉकडाउनमुळे सर्व घरी बसले. नोकरी करणारे गावाकडे आले. ते काही काळ घरातच राहिल्याने कंटाळले त्यातून घरबसल्या विविध खेळ, पाककृती, ऑनलाइन शिक्षण, कोरोना बाधितांना मदत असे उपक्रम सुरू झाले.
दहावीत 2003 मध्ये शिकणाऱ्या वर्गमित्रांनी घर बसल्या सीड बॉल बनवण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यात सैन्य दलातील सुटीवर आलेल्या जवान मित्र आणि स्थानिक शेतकरी सहभागी झाले. त्यांनी मुलांच्या मदतीने करंज, जांभूळ, फणस, हेळा, सिताफळ, साग अशा देशी झाडांच्या बिया गोळा केल्या, त्यांचे शेण, मातीने सीड बॉल तयार केले. एप्रिल, मे दोन महिने हे काम करून 2000 सिडबॉल तयार केले.
जूनच्या सुरवातीला गावाजवळच्या डोंगरावर खड्डे काढून त्या पुरल्या. त्यातील सुमारे 400 बियांची चांगली उगवण झाली. हे पाहून या तरुणांनी आणखी 1000 रोपांची लागण करून उजाड डोंगराला हिरवे बनविण्याचा निर्धार केला. त्याला सरपंच सागर पाटील, ग्रामसेवक राजेंद्र सातवेकर यांनी साथ देत वनविभागाकडून रोपे देण्याचा भार उचलला. येत्या 1 ऑगस्टला रोपांचे वृक्षारोपण होणार आहे. विशांत देसाई, करसिध्द धनगर, पुडंलिक पाटील, रमेश पाटील, महेश पाटील, युवराज पाटील, सुनील पाटील, सागर पाटील, अमोल पाटील आदींनी पुढाकार घेतला आहे.
पाच हजार रोपांचा संकल्प
निसर्ग आणि गावची आस असणाऱ्या बाहेरगावी नोकरीनिमित्त राहणाऱ्या तरुणांनी स्थानिक वर्गमित्र एकत्र करून काम सुरू केले. त्यात सातत्य ठेवण्यासाठी पुढील वर्षी पाच हजार रोपे लावण्याचा संकल्प केला. तर लावलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे.
संपादन - यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.