कोल्हापूर : महाराष्ट्राच्या कुठल्याही भागातील माणूस असो; ‘बिलनशी नागिण निघाली...’, ‘वाट बघतोय रिक्षावाला...’ अशी गाणी वाजू लागली, की आपसूकच त्याचे पायही थिरकतात. नृत्य प्रत्येकाच्या नसानसांत भिनलेले आहे; मात्र त्याच्या सातत्यपूर्ण सरावातून शारीरिक आणि मानसिक फायदेही मोठे आहेत. विशेषतः कोरोनाच्या काळात ‘इम्युनिटी बूस्टर’ म्हणून त्याचा अधिक फायदा होताना दिसत आहे. विविधतेने नटलेल्या मराठी मुलखातील असो किंवा देशभरातील विविध लोकनृत्यांवर आधारित ‘फोक फिटनेस’चा ट्रेंड पुन्हा वाढू लागला आहे, तर जुन्या आणि नव्या गाण्यांच्या फ्युजनवरील नृत्याविष्कारही शाळकरी मुलांपासून सत्तर वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत साऱ्यांनाच भुरळ घालत आहेत.
गेल्या वर्षभराचा विचार केल्यास राज्यातील डान्स क्लासेसची अवस्था बिकट आहे. क्लासेस नाहीत, स्नेहसंमेलने नाहीत, युवा महोत्सव नाही आणि स्पर्धाही नाहीत. या साऱ्या पार्श्वभूमीवर डान्स क्लासचालकांची आर्थिक कुचंबणा होत असली तरी ऑनलाईन माध्यमाचा त्यांनी आता आधार घेतला आहे. अधिकाधिक लोकांनी नृत्याच्या माध्यमातून केवळ छंद किंवा टाईमपास म्हणून नव्हे, तर सर्वांगीण आरोग्य जपावे, यासाठी आग्रह आहे. ही सारी प्रशिक्षक मंडळी आता नृत्य परिषदेच्या माध्यमातून एकवटली आहेत. भारतीय, पाश्चिमात्य नृत्यशैली आहेतच; पण विशेष म्हणजे सर्व लोककलावंतांना एकत्र आणून लोकनृत्यांवर आधारित छोटे अभ्यासक्रमही परिषदेच्या वतीने लवकरच सुरू केले जाणार आहेत.
नाचून थका, रिफ्रेश व्हाल...
"संगीत आणि नृत्यातून शरीरावर किंवा अगदी मानसिकतेवर होणाऱ्या सकारात्मक बदलांबाबत अनेक संशोधने झाली आहेत आणि त्यातून नृत्यानंदाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. मनाला भावणाऱ्या संगीतावरील नृत्याविष्कार आपल्यातील चेतना जागवत असतो. मुळात आपण नाचून थकतो, तेथूनच आपण रिफ्रेश होत जातो. कारण घामावाटे शरीरातील सर्व विषारी द्रव्ये बाहेर फेकली जात असतात. लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी नृत्य हे उत्तम औषध आहे. ज्यांना व्यायामाचा, फिरायला जाण्याचा कंटाळा असेल त्यांनी नृत्यानंदाचा अनुभव घ्यायलाच हवा."
- सागर बगाडे, विभागप्रमुख, नृत्य परिषद
डान्स पॉझिटिव्ह एनर्जी
"नृत्य म्हणजे खऱ्या अर्थाने एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, जी शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळीवर उपयुक्त ठरते. त्यामुळेच विविध सण-उत्सवात हमखास नृत्याची परंपरा आपल्याकडे आहे. वर्षातून एकदा मंगळागौर असो किंवा अगदी काटवटकणा घातला तरी महिलांच्या आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात; पण काळानुरूप हे प्रमाण कमी होत असल्याने याबाबतची जागरूकता आम्ही वाढवत आहोत. महाराष्ट्रात ज्या ज्या अस्सल मराठमोळ्या नृत्यशैली आहेत, त्यांचा अभ्यास करून लवकरच राज्यभरात काही अभ्यासक्रम मोबाईल ॲपच्या माध्यमातून सुरू करणार आहोत."
- दीपक बीडकर, समन्वयक, अभ्यासक्रम समिती
व्यायाम अन् इम्युनिटी बूस्टर
"कोल्हापूरचाच विचार केल्यास त्र्यंबोली यात्रा, गणपतीमध्ये खेळले जाणारे लेझीम हळूहळू कालबाह्य होऊ लागले आहे; मात्र लेझीम खेळण्याचा अनुभव खूप आनंददायी आणि म्हणूनच शारीरिक व मानसिक फायदे देणारा असतो. लेझीम एक उदाहरण झाले; पण आता जगभरातील विविध नृत्यशैलींचे प्रशिक्षण शहरात उपलब्ध आहे. बालमित्रांपासून ते महिला आणि ज्येष्ठांपर्यंत वर्ग घेणाऱ्या क्लासेसची संख्याही मोठी आहे. विशेषतः अलीकडच्या काळात जुन्या गाण्यांवरील डान्सची क्रेझ वाढली आहे. एकूणच नृत्यशैली कुठलीही असली तरी ती ‘इम्युनिटी बूस्टर’च आहे."
- संग्राम भालकर, नृत्य दिग्दर्शक
शास्त्रीय नृत्याची आनंदानुभूती
"शरीर, मन आणि आत्मा अशा तिन्ही गोष्टींवर शास्त्रीय नृत्याचा सकारात्मक परिणाम होत असतो. शास्त्रीय नृत्याचा विचार केला तर ते एक अतिशय चांगले ‘मेडिटेशन’ आहे. श्वासावर नियंत्रण, स्नायूंच्या हालचाली या साऱ्या गोष्टी परिणामकारकच ठरतात. मुळात आयुर्वेदात नृत्यचिकित्सेवर विशेष मांडणी केली आहे आणि नृत्यसराव एक उपचारपद्धती म्हणून महत्त्वाची मानली आहे. अलीकडेच मानवी मेंदू आणि नृत्यासंबंधीच्या झालेल्या अभ्यासातूनही अनेक सकारात्मक गोष्टी पुढे आल्या आहेत. शास्त्रीय नृत्यातून पेरली जाणारी सकारात्मकतेची बीजं व्यक्तिमत्त्व विकासातही महत्त्वाची ठरतात."
- जान्हवी शिंगटे, भरतनाट्यम् नृत्यांगना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.