मराठा समाजाच्या या हाकेला प्रतिसाद देत शहरात सकाळपासूनच शुकशुकाट पाहायला मिळाला. समाजाच्या प्रत्येकस्तरातून आणि क्षेत्रातून बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
इचलकरंजी : जालना येथील मराठा समाज आंदोलकांवर (Jalna Maratha Andolan) पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ काल (बुधवार) सकल मराठा समाजाने (Maratha Community) पुकारलेल्या बंदला इचलकरंजी शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरात सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती.
बंदमुळे दिवसभर शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट होता. कोल्हापुरात कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील दुसऱ्या मोठ्या इचलकरंजी शहरातही बंदला (Ichalkaranji Bandh) कडकडीत प्रतिसाद मिळाला. यामुळे शहरातील दैंनदिन सुमारे ४३० कोटींची उलाढाल ठप्प झाली.
येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेचा निषेध करत बुधवारी (ता. ६) इचलकरंजी शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. मराठा समाजाच्या या हाकेला प्रतिसाद देत शहरात सकाळपासूनच शुकशुकाट पाहायला मिळाला. समाजाच्या प्रत्येकस्तरातून आणि क्षेत्रातून बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्राथमिक, माध्यमिक, इंग्लिश मीडियम शाळांसह वरिष्ठ, कनिष्ठ, अभियांत्रिकी महाविद्यालये अशी सुमारे १५५ शैक्षणिक संकुले बंद राहिली. सकाळच्या सत्रात बाहेरील आगाराच्या काही किरकोळ फेऱ्या वगळता दिवसभर येथील मध्यवर्ती बसस्थानक निर्मनुष्य होते. त्यामुळे सुमारे ३० हजार किलोमीटरच्या प्रवासासह एसटीच्या आज सुमारे ५५० फेऱ्या शहापूर आगारात जागीच थांबून राहिल्या.
पहाटे तीन तीन वाजता सुरू होणाऱ्या चहाच्या टपऱ्याही बंद राहिल्या. हॉटेल, बार, व्यापारी, व्यावसायिकांनी सकाळपासून सर्व व्यवहार बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदवला. न्यायालयात पक्षकार, वकिलांची वर्दळ दिसून आली नाही. वडगाव बाजार समितीत भाजीपाल्याची आवक कमी झाली. तसेच दैनंदिन बाजारात तुरळक विक्रेते होते. धान्यओळीत सर्व व्यापाऱ्यांनी दिवसभर दुकाने बंद करून सकल मराठा समाजाला पाठिंबा दिला.
त्यामुळे नेहमी गजबज असणाऱ्या ठिकाणी अवजड धान्य वाहने दिसली नाहीत. रिक्षाचालक, मालवाहतूक संघटनांनी व्यवसाय बंद करून बंदला समर्थन दिले. वैद्यकीय, बँकींग सेवांसह अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. कोल्हापूर रोड, शाहू पुतळा मार्ग, डेक्कन रोड, संभाजी चौक मार्गे, तीन बत्ती चौक, शिवतीर्थ ते गांधी पुतळा चौक मार्ग, राजवाडा चौक,सांगली रोड आदी गजबजलेल्या व वर्दळीच्या ठिकाणी शुकशुकाट होता.
इचलकरंजी बंदच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी पोलिस दलाच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातून पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला होता. शहरातील प्रमुख चौकांसह मार्गांवर पोलिस कर्मचारी तैनात होते. एक अप्पर पोलिस अधीक्षक, दोन पोलिस उपाधीक्षक, तीन पोलिस निरीक्षक यांसह ३३ पोलिस अधिकारी, २५२ पोलिस कर्मचारी, ३४ वाहतूक पोलिस, तीन स्ट्रायकिंग फोर्स असा ३५० पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त दिवसभर होता.
यड्राव फाटा चौकात आज व्यवसाय सुरळीत सुरू होते. मात्र काही जणांनी व्यवसाय बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी एका हॉटेल व्यावसायिकाच्या शटरवर दगडफेक करण्यासह मारहाणीचा प्रकार घडला. या घटनेनंतर चौकातील सर्व व्यवहार बंद झाले. यानंतर तणावावर शहापूर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत नियंत्रण आणले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.