'बंदमध्ये मराठा समाजाने भाजीच्या देठालाही हात लावलेला नाही. ही वज्रमूठ कायम ठेवून सरकारचा गड उद्ध्वस्त करू.'
कोल्हापूर : अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा आंदोलकांवर (Jalna Maratha Andolan) लाठीमाराचा आदेश नसल्याची टिमटिम सुरू झाली आहे. मराठ्यांशी खोटे बोलू नका. लाठीमार प्रकरणात गृहमंत्री मुख्य सूत्रधार असल्याचा आमचा संशय असल्याचं मत वसंतराव मुळीक यांनी व्यक्त केलं.
गृहमंत्र्यांच्या माफीची नाही तर त्यांनी खुर्चीतून पायउतार होण्याची आमची मागणी आहे. मराठ्यांनी आत्मदहन करायचे नाही की, हातात दगड घ्यायचा नाही. मरायचे नाही तर आता रस्त्यावर उतरून लढायचे, असे आवाहनही सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक यांनी येथे केले.
सकल मराठा समाजातर्फे कोल्हापूर बंदच्या पार्श्वभूमीवर दसरा चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. मराठा समन्वयकांनी लाठीमाराचा निषेध करत सरकारवर निशाणा साधला. मराठ्यांची वज्रमूठ कायम ठेवत गृहमंत्री राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना १० सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यात काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याचा निर्णय झाला.
राष्ट्रवादी (शरद पवार गट) कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील म्हणाले, ‘मराठा समाजाची भावना तीव्र आहे. माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही.’ ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई म्हणाले, ‘आठ दिवसांत सरकारने एकही निर्णय घेतलेला नाही. याचा अर्थ सरकारची ती क्षमता नाही. मराठ्यांना थापा मारायच्या. सरड्यासारखा रंग बदलून फसवण्याचा उद्योग सुरू आहे.
सगळेच एका माळेचे मणी आहेत. मराठ्यांना शिक्षणात तरी आरक्षण द्या. मुले आत्महत्या करत असून, जमिनीचे तुकडे विकले जात आहेत. मराठा नेते कोठे आहेत? आरक्षणप्रश्नी एकही नेता मी राजीनामा देतो, असा म्हणत नाही. ’
ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले, ‘आंदोलकांवर पहिली पोलिसांची काठी पडली असून, त्यानंतर दगडफेक झाली आहे. एक अधिकारी कोल्हापुरात ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्यास दंगल घडेल असे म्हणतो, तर दुसरा आंदोलकांवर थेट लाठीमार करतो. हे मराठा समाजाविरूद्ध छुपे युद्ध केले जात असल्याचे आमचे म्हणणे आहे.’
ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय देवणे म्हणाले, ‘एक फुल्ल दोन हाफ टिकट असे राज्यातील सरकार आहे. अमानुष हल्ला झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सारवासारव केली जात आहे. त्यापेक्षा मराठ्यांना आरक्षण द्या. मराठा आरक्षणाबाबत चुकीचे वक्तव्य करणारा ‘तो’ अधिकारी प्रशासनाचा हस्तक आहे.
बंदमध्ये मराठा समाजाने भाजीच्या देठालाही हात लावलेला नाही. ही वज्रमूठ कायम ठेवून सरकारचा गड उद्ध्वस्त करू.’ माजी उपमहापौर रविकिरण इंगवले म्हणाले, ‘राजकीय परिस्थिती पाहता मराठा समाजाची कुचेष्टा केली जात आहे.’
माजी महापौर आर. के. पोवार यांनी दहा सप्टेंबरच्या निदर्शनात सहभागी होऊ, अशी ग्वाही दिली. पांडुरंग साळोखे यांनी अजित पवार यांनी मराठा आरक्षणाचे पत्रच घेऊन यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शाहीर मिलिंद सावंत यांनी हे खोक्यावर बसलेले सरकार असल्याचा आरोप केला.
या वेळी आमदार पी. एन. पाटील, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, शशिकांत पाटील, बाबा पार्टे, गणी आजरेकर, कादर मलबारी, महादेव पाटील, अवधूत पाटील, लाला गायकवाड, सुनील मोदी, हेमंत साळोखे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, सुशील भांदिगरे, धनंजय सावंत, अमोल डांगे, मनसेचे राजू जाधव,शशिकांत जाधव, अनिल पाटील, विजय सावंत, संजय गायकवाड, शाहीर दिलीप सावंत, भय्या काशीद, ओंकार पाटील, हरिष राणे, राजू हांडे, राजू जाधव, मंजित माने, रणजित आयरेकर, अनिकेत शिंदे, राजू मेंगाणे, अमर पाटील, संजय पोवार, अवधूत साळोखे उपस्थित होते.
‘कोल्हापुरातील सभेसाठी येणाऱ्या अजित पवार यांच्या गाडीखाली मी पहिली उडी मारायला तयार आहे. भाजपवाले समाजाला खेळवत आहेत. त्यांना आरक्षण द्यायचे नाही. जाणीवपूर्वक काही अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात असल्याचा आरोप करत संजय पवार यांनी जालना पोलिस अधीक्षक दोशी यांना बडतर्फ करावे, अशी मागणी केली.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय, जय भवानी जय शिवाजी, चले जाव चले जाव शिंदे सरकार चले जाव, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, मराठ्यांवर लाठीमार करणाऱ्या नादान सरकारचा धिक्कार असो, मराठाद्वेषी सरकारचं करायचे काय खाली डोके वर पाय, राजीनामा द्या राजीनामा द्या, शिंदे-फडणवीस-पवार सरकार राजीनामा द्या, या घोषणांनी दसरा चौक आज पुन्हा दणाणला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.