शाहू कारखान्याची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ द्यायची नाही, असा चंग मुश्रीफ यांनी बांधला होता.
कोल्हापूर : जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीपासून कागलच्या राजकारणात सुरू असलेल्या मंडलिक-मुश्रीफ गटांत (Mandlik-Mushrif Group) ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वादाची ठिणगी पडली आहे. माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांचे पुत्र ॲड. वीरेंद्र मंडलिक यांनी उघडपणे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावरच टीका करून या वादाला पुन्हा एकदा तोंड फोडले आहे.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत ॲड. वीरेंद्र यांच्यासह त्यांच्या आत्या आणि आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी सुस्मिता यांचा पराभव झाला. #ElectionWithSakal या निवडणुकीच्या निकालानंतरच ॲड. वीरेंद्र यांनी, ‘माझा पराभव झाला असून तो केला गेला,’ अशी पोस्ट समाजमाध्यमांवर टाकताना अप्रत्यक्षरीत्या मुश्रीफ यांना ‘टार्गेट’ केले होते. राज्यातील बदलत्या राजकारणात मुश्रीफ हे महायुतीत सहभागी झाले. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असलेले प्रा. मंडलिक यांचा पराभव झाला. या पराभवामागेही मुश्रीफ हेच असल्याचा थेट आरोप ॲड. वीरेंद्र यांनी करून खळबळ उडवून दिली आहे.
कागल विधानसभा मतदारसंघात पक्षापेक्षा गटा-तटाच्या राजकारणाला मोठे महत्त्व आहे. मंडलिक, मुश्रीफ, राजे असे तीन गट मतदारसंघात कार्यरत आहेत. लोकसभेला हे तिन्हीही गट एकत्र असूनही प्रा. मंडलिक यांना अपेक्षित मताधिक्य मतदारसंघातून मिळाले नाही, याचा राग ॲड. वीरेंद्र यांच्यासह स्वतः प्रा. मंडलिक यांनाही आहे. मात्र, प्रा. मंडलिक यांच्यापेक्षा ॲड. वीरेंद्र यांनी त्यावर आज उघडपणे भाष्य करून भविष्यातील राजकारणात मंडलिक गट काय करेल, याची झलक दाखवून देताना मुश्रीफ यांनाही एकप्रकारे इशारा दिला आहे.
त्यातच, प्रत्येक निवडणुकीत मुश्रीफ यांच्याविरोधात शड्डू ठोकणारे माजी आमदार संजय घाटगे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला. त्याचाही राग मंडलिक गटाचे नेते म्हणून ॲड. वीरेंद्र यांना आहे. अशातच घाटगे यांची मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेवर वर्णी लावून या गटाला बळ दिल्याचे मंडलिक गटाला आणि पर्यायाने ॲड. वीरेंद्र यांनाही आवडलेले नाही. ही खदखदही त्यांनी आजच्या मेळाव्यात व्यक्त केल्याचे बोलले जाते.
शाहू कारखान्याची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ द्यायची नाही, असा चंग मुश्रीफ यांनी बांधला होता. त्यासाठी संजय घाटगे गटाच्या ३२ जणांचे अर्ज भरण्यात आले. मात्र, या सर्व उमेदवारांनी आपल्याही कारखान्याला ऊस घातल्याचे पत्र ॲड. वीरेंद्र यांनी दिल्याने या सर्वांचे अर्ज अवैध ठरले. त्यातून पहिल्यांदा ॲड. वीरेंद्र यांनी मुश्रीफ यांच्या डाव उधळून लावला होता. आज थेट आरोप करून भविष्यात काय होईल, याची झलक त्यांनी दाखवून दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.