कोल्हापूर : पाय घसरला तर थेट दरीत पडण्याची भीती, उभी चढण, घोंगावणारा वारा, वरून कोसळणारी संततधार आणि चहूबाजूला दाट धुके अशा स्थितीत इर्शाळवाडीतील बचावकार्यात तीन दिवस व्हाईट आर्मीने कष्ट उपसले. १० ते १५ फुटांपर्यंतच्या मातीच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढताना येणाऱ्या अनंत अडचणींवर मात करत २७ जणांचे मृतदेह बाहेर काढले. मृतदेहांवर अंत्यसंस्काराची जबाबदारीही उचलली. धैर्याने मदतकार्यात सहभागी झालेल्या व्हाईट आर्मीचे कौतुक प्रशासनानेही केले.
इर्शाळवाडीतील ४३ पैकी ४० घरे दरडीखाली गाडली गेली. बुधवारी (ता. १९) च्या रात्री साडेदहा - अकराच्या सुमारास इर्शाळवाडीवर दरडीने घाला घातला. ही बातमी गुरुवारी (ता. २०) कळताच व्हाईट आर्मी बचाव कार्यासाठी रवाना झाली. रात्री बाराला गडाच्या पायथ्याशी पोचली. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता गड चढायला सुरुवात केली.
मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, निसरड्या पायवाटा आणि चहूबाजूने धुके यांची तमा न बाळगता दीड - दोन तासांची चढाई केल्यानंतर दुर्घटनाग्रस्त परिसरात पोचले. डोंगराचा कडाच घरांवर कोसळल्याने नेमके गाव कसे असावे, याचा अंदाजही बांधता येत नव्हता. स्थानिकांच्या मदतीने घर कोठे असेल, याचा अंदाज घेत ढिगारे उपसण्याचे काम सुरू झाले. पायाखाली चिखल आणि जोरदार वाऱ्यामुळे अडथळा येत होता.
कुदळ व फावड्याच्या सहाय्याने मृतदेह कोठे असतील, याचा अंदाज घेतला जात होता. मृतदेह खाली आहे हे कळताच त्याच्यावर जड पहार ठेवून फळ्या टाकून ढिगारा बाजूला करत मृतदेह बाहेर काढावा लागत होता. एक मृतदेह काढण्यासाठी पाच तासांचा वेळ लागायचा. पहिल्या
दिवशी १६, दुसऱ्या दिवशी ६ आणि तिसऱ्या दिवशी ५ मृतदेह व्हाईट आर्मीने बाहेर काढले. छिन्नविछिन्न मृतदेह पाहताना डोळ्यांत अश्रू तरळायचे. सकाळी दीड तास चढाई, सायंकाळी काळोखानंतर पुन्हा गड उतरून बचावकार्यात जीवाची बाजी लावली. एनआरएफ व स्थानिक गिर्यारोहकांनी बाहेर काढलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्काराची जबाबदारीही व्हाईट आर्मीच्या जवानांनी पेलली.
व्हाईट आर्मीचे सहभागी जवान अशोक रोकडे, सचिन भोसले, सुधीर गोरे, केतन म्हात्रे, नीतेश वनकोरे, प्रशांत शेंडे, विनायक भाट, शैलेश रावण, सुमित साबळे, ऋणाल राऊत, श्रीकांत पाटील, अनिल बिरजे, योगेश जाधव, सुनील दळवी, डॉ. शर्वरी रोकडे.
शारीरिक, मानसिक कस
यापूर्वी माळीण किंवा उत्तराखंडातील आपत्कालीन परिस्थितीत पोकलेन, जेसीबी, क्रेन व इतर यंत्रांच्या सहाय्याने बचावकार्य सोपे होत होते. मात्र सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत घडलेल्या या दुर्घटनेत डोंगर चढून नैसर्गिक अडथळ्यांचा सामना करत कुदळ व फावड्याने चिखल उपसणे, सोपे नव्हतेच. इर्शाळवाडीत निर्धारपूर्वक बचाव कार्यात वाहून घेतल्याचे व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.