कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी श्री अंबाबाईची बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात सालंकृत पूजा बांधली. ही पूजा गजानन मुनीश्वर, मुकुल मुनीश्वर, रामकृष्ण मुनीश्वर आणि श्रीनिवास जोशी यांनी बांधली. ऐतिहासिक भवानी मंडपातील श्री तुळजाभवानीची दीपलक्ष्मी रूपातील आकर्षक पूजा बांधली. दरम्यान, आज रात्री श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा सजणार आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई श्री शाकंभरी देवी रूपात आज सजली. श्री शाकंभरी देवी अष्टभुजा असून, सिंहवाहिनी आहे. श्री शाकंभरी देवीचे बदामी हे परमपवित्र क्षेत्र अतिप्राचीन काळापासून सुप्रसिद्ध आहे. स्कंदपुराणाच्या १५ व्या अध्यायामध्ये याचे सविस्तर वर्णन असून, सप्तशक्ती, देवी भागवत, करवीर माहात्म्य या ग्रंथामध्येसुद्धा श्री शाकंभरी देवीच्या अवताराचा उल्लेख आहे. काशीक्षेत्रातून बाहेर पडलेले अगस्त्य ऋषी विंध्याला नमवून दक्षिणकाशी करवीर या तीर्थक्षेत्रात आपली पत्नी लोपामुद्रा हिच्यासह आले.
तेव्हा श्री करवीरनिवासिनी अंबाबाईने त्यांना तेथे केवळ सहा महिनेच राहण्याची अनुज्ञा दिली आणि त्यानंतर त्यांनी बनशंकरीच्या क्षेत्रात जाऊन तिची उपासना करावी, असा आदेश दिला याप्रमाणे अगस्त्य ऋषी हे या दोन्ही क्षेत्रांमधील दुवा असल्याचे दिसते. ज्यावेळी अनेक वर्षांचा मोठा दुष्काळ पडला, तेव्हा ऋषीमुनींनी आणि देवांनी जगदंबेची प्रार्थना केली. त्यावेळी जगदंबेने प्रकट होऊन स्वतःच्या शरीरातून शाक भाज्या निर्माण करून जगाचे पोषण केले, म्हणून तिला शाकंभरी असे नाव मिळाले.
अंबाबाईच्या मुखकमलाची २१ फुटी प्रतिकृती
सोमवारी (ता. ३) हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा सळसळत्या उत्साहात साजरा होईल. रात्री नऊच्या सुमारास अंबाबाईच्या वाहनाचे पूजन होऊन नगरप्रदक्षिणेला प्रारंभ होईल. महाद्वार, गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर या पारंपरिक मार्गांवरून जाताना फुलांच्या पायघड्या आणि रांगोळ्यांनी देवीचे स्वागत होईल. तुळजाभवानी मंदिरात पानाचा विडा देऊन देवीचे स्वागत होईल. न्यू गुजरी तरुण मंडळातर्फे यंदा नगरप्रदक्षिणा मार्गावर विविधरंगी फुलांत अंबाबाईच्या मुखकमलाची २१ फुटी प्रतिकृती उभारली जाणार आहे.
रुद्रांश ॲकॅडमीतर्फे संगीतसेवा
श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त होणारे सांस्कृतिक कार्यक्रम भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सोमवारी (ता. ३) सकाळी आठ ते अकरा या वेळेत मंगेश महालक्ष्मी भजनी मंडळ व विठुमाऊली भजनी मंडळ भजन सादर करतील. सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ, दुर्गादेवी भजनी मंडळ संगीतसेवा करतील. दुपारी दोन ते सायंकाळी पाच यावेळेत दुर्गामाता महिला भजनी मंडळ, विश्वमैत्रीण महिला भजनी मंडळाचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. पाच ते सात या वेळेत बिंदूराव यांचे भरतनाट्यम सादरीकरण होईल. तसेच अमृतधारा गीत मंच, हुपरी यांचा सांगीतिक कार्यक्रम होईल. रात्री सात ते नऊ या वेळेत रुद्रांश ॲकॅडमीतर्फे संगीतसेवा, नृत्याविष्कार सादर होतील.
अनिरुद्ध उपासनातर्फे स्वच्छता
श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आणि अनिरुद्धाज् ॲकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटतर्फे नवरात्रोत्सवात दरवर्षी गर्दी नियंत्रण, भक्तांना दर्शनासाठी मार्गदर्शन, पाणी वाटप सेवा पुरविल्या जातात. यंदाही सकाळी ६ पासून ते रात्री ११ पर्यंत ही पुरविण्यात येत आहे. रोज पालखी सोहळ्यानंतर मंदिर स्वच्छता करून सेवेची सांगता होते. गेली १७ वर्षे सातत्याने संस्थेतर्फे ही सेवा केली जात आहे. यावर्षी २ हजार ५०० कार्यकर्त्यांनी या सेवेत सहभाग घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.