कोल्हापूर : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तारीख बदलण्यात आली असून, आता नव्या कार्यक्रमानुसार या निवडणुकीसाठी ५ जानेवारीला मतदान होणार आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने या कार्यक्रमाला आज मंजुरी दिली. सोमवारपासून (ता. २९) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
दरम्यान, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार बँकेसाठी २९ डिसेंबरला मतदान होणार होते; तथापि राज्य विधिमंडळाचे अधिवेशनही त्याच काळात असल्याने व अर्ज माघारीनंतर प्रचारासाठीचा कालावधीही कमी होत असल्याची तक्रार आल्याने मतदानाची तारीख बदलण्यात आली. जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या २१ जागांसाठी निवडणूक आहे. बँकेच्या ११ हजार ४४८ मतदार संस्थांपैकी सात हजार ६५० संस्थांचे ठराव पात्र ठरले आहेत. विकास सोसायटी गटातील प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे १२, महिला प्रतिनिधी व प्रक्रिया संस्था गटातील प्रत्येकी दोन, नागरी बँक-पतसंस्था गट, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी, अनुसूचित जाती व भटक्या विमुक्त गटातील प्रत्येकी एक अशा २१ जागांसाठी निवडणूक आहे. निवडणुकीसाठी यापूर्वीच प्रभारी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
बँकेत राष्ट्र्वादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ बँकेचे नेतृत्व करतात. बँकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय श्री. मुश्रीफ यांनी घेतला आहे; तथापि प्रक्रिया संस्था गटातील बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या नावाला विरोध करत ‘जनसुराज्य’चे आमदार विनय कोरे यांनी विकास सोसायटी गटातील दोन जागांव्यतिरिक्त आणखी एका जागेची मागणी केली आहे. यावरून मतभेद झाल्यास श्री. कोरे यांचे काही गटात स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचे नियोजन आहे. तथापि आजच विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यात श्री. कोरे यांचा पुढाकार राहिल्याने बँकेच्या निवडणुकीतही ते श्री. मुश्रीफ यांचा ‘शब्द’ पाळतील, अशी शक्यता आहे.
विकास संस्था गटातून काही तालुक्यांत विद्यमान संचालकांविरोधातच काहींनी तयारी सुरू केली आहे. किमान सहा तालुक्यांत या लढतीची शक्यता आहे. यावर तोडगा काढणेही अशक्य असल्याने श्री. मुश्रीफ बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असले तरी विकास संस्था गटात काही तालुक्यांत निवडणूक अटळ आहे. तशी कबुलीही श्री. मुश्रीफ यांनी विधान परिषदेच्या निकालानंतर दिली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर यासंदर्भातील घडामोडींना वेग येणार आहे.
निवडणूक कार्यक्रम असा
२९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर - उमेदवारी अर्ज दाखल करणे
६ डिसेंबर - उमेदवारी अर्जांची छाननी
७ डिसेंबर - पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध
८ ते २१ डिसेंबर - उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी
५ जानेवारी - मतदान
७ जानेवारी - मतमोजणी
आज बैठक
जिल्हा बँकेच्या संभाव्य रणनीतीबाबत शनिवारी (ता. २७) ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहावर बैठक होणार आहे. या बैठकीला जिल्हा बँकेच्या राजकारणाशी संबंधित सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे. श्री. मुश्रीफ यांनीच ही माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.