कोल्हापूर - काँग्रेस पक्षाने कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर अन्य पक्षांच्या उमेदवारांना प्रामाणिक साथ दिली, पण निवडून आलेले खासदार अन्य पक्षात गेले. जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसने दोन्ही जागा लढवाव्यात, अशी मागणी आज पुणे येथे पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठकीत करण्यात आली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार विश्वजीत कदम, आमदार जयंत आसगावकर आदी उपस्थित होते.
‘कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे तीन आमदार आहेत. शिक्षक मतदारसंघ आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत विरोधी पक्षाचे जबरदस्त आव्हान असतानाही आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने निवडणुकी जिंकून दाखवल्या.
जिल्ह्यातील गोकुळ, जिल्हा बँक , साखर कारखाने, अन्य सहकारी संस्थेत काँग्रेसची मजबूत पकड आहे. जिल्हा परिषद ,पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये काँग्रेसने संघटन बळकट केले असून आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेसने लढवावी’,
अशी जोरदार मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. इचलकरंजीतील पदाधिकाऱ्यांनीही लोकसभा निवडणूक लढवायची मागणी केली. आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी जिल्ह्यातील बारा तालुके आणि दहा विधानसभा मतदारसंघातील बूथ कामाचा आढावा घेतला.
बूथचे काम कागदोपत्री न करता वस्तुनिष्ठपणे करावे, असा सल्लाही कार्यकर्त्यांना दिला. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. महाविकास आघाडीच्या जागा वाटपानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहनही पटोले यांनी यावेळी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.