kolhapur sakal
कोल्हापूर

Kolhapur News : जिल्ह्यात पावसाची संततधार सर्व धरणे शंभर टक्के भरली ; नदीपात्रात विसर्ग सुरू

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच राहिली आहे. यामुळे भविष्यात पिण्याच्या आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता कमी होण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील लहान-मोठी धरणे आता शंभर टक्के भरली आहेत. राधानगरी धरणातून ४०० क्युसेक आणि काळम्मावाडी धरणातून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. जिल्ह्यातील इचलकरंजी हा एकच बंधारा पाण्याखाली गेला आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. शेती, शेतकरी, उद्योगासह भविष्यातील पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतर ऑगस्टमध्ये वीस ते बावीस दिवस विश्रांती घेतली होती. त्यानंतर पुन्हा एकदा कमी अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसाने सर्वांनाच दिलासा दिला आहे.

पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने आज सायंकाळी ५ वाजता धरणातून ६४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला असून, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे ज्या-त्या नदीपात्रात धरणांमधून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

जिल्ह्यात सर्वदूर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास काही प्रमाणात मदत मिळणार आहे. हा पाऊस आणखी चार ते पाच दिवस याच पध्दतीने सुरू राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

‘काळम्मावाडी’तील पाणीसाठा २४ टीएमसीवर

राधानगरी पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसाने जलाशयात पाण्याची आवक वाढल्याने काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा २४ टीएमसीवर पोहोचला आहे. आता धरण भरण्यासाठी एक टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा होणे बाकी आहे. दरम्यान, धरणातून वीजनिर्मितीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. पायथ्या वीजगृहातून वीजनिर्मितीसाठी बाराशे क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. धरण आज सायंकाळी ९६.३२ टक्के भरले.

धरणात २४.४८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हे धरण ६४६ मीटर पाणीपातळी झाली की पूर्ण भरते. आज सायंकाळी पाणी पातळी ६४५.२२ मीटरपर्यंत पोहचली आहे. गतवर्षी धरण ९० टक्के भरल्यानंतर पाणीसाठ्यात घट करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यापासून वक्राकार दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला होता.

तुळशी धरणक्षेत्रात जोर

धामोड : येथील तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. येथे १२ तासांत १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे . केळोशी बुद्रुक येथील लोंढा नाला प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग धरण क्षेत्रात येत असून, सध्या तुळशी धरण ८७ टक्के भरले आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर तुळशी धरण क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रात वाढला आहे. धरणक्षेत्रात आजअखेर एकूण २७३७ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.

मसाई पठार परिसराला झोडपले

देवाळे जेऊर, पैजारवाडी, देवाळेसह मसाई पठार परिसराला आज दिवसभर पावसाने झोडपले. पठार परिसरात दिवसभर दाट धुक्याबरोबरच जोरदार पाऊस बरसला. आज रविवार असल्याने पर्यटक पाऊस-धुक्याचा मनसोक्त आनंद घेत होते. या आठवड्यात पडलेल्या पावसाने माळरानावरील पिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

पिकांना मिळाली उभारी

जिल्ह्यात भात, भुईमूग, सोयाबीन, नाचणीसह इतर पिकांना चांगलीच उभारी मिळाली आहे. माळरानातील भात व सोयाबीन परिपक्व होण्याआधीच पाण्याअभावी करपण्याचा धोका होता. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे भात परिपक्व होऊन कापणी योग्य होण्यास मदत होणार आहे.

चांदोली धरणाचे चारही दरवाजे उघडले

तुरुकवाडी चांदोली धरण प्रशासनाने धरणातून विसर्ग वाढवला असून, वारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चांदोली धरण शंभर टक्के भरले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची अतिवृष्टी सुरू आहे. आवक पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने आज सायंकाळी

पाच वाजता धरणाच्या वक्राकार दरवाजेद्वारे ५०००क्युसेक, वीजनिर्मिती केंद्रातून १४०० असा एकूण ६४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आवक पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग वाढविण्यात येणार आहे. दरम्यान, शाहूवाडी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वारणा, कानसा, कासारी, साळी, कडवीनदींची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. कोकरुड -रेठरे दरम्यानचा वारणानदीवरील बंधारा पाण्याखाली गेला आहे. रेठरे परिसरातील वाहतूक तुरुकवाडीमार्गे वळवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT