२५ ऑगस्टला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांची श्रीमती कुपेकर यांनी भेट घेतली, त्यावेळी पवार यांनीच त्यांना ‘तयारी लागा’ असा कानमंत्र दिला आहे.
कोल्हापूर : लोकसभा (LokSabha) आणि विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) महिलांना (Women) ३३ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक संसदेत मांडले आहे. त्याच्या अंमलबजावणीबाबत संभ्रमावस्था असली, तरी विधानसभेच्या आगामी निवडणुकीत हे आरक्षण लागू होऊ दे, अगर नाही; पण चार महिला उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना पन्नास टक्के आरक्षण (Women's Reservation) आहे. लोकसभा व विधानसभेला मात्र महिलांसाठी स्वतंत्र आरक्षित मतदार संघ नव्हते. येथेही महिलांना आरक्षण द्यावे, अशी बऱ्याच दिवसांची मागणी होती. त्याला (ता. १९) संसदेत मांडलेल्या विधेयकांमुळे मूर्त स्वरूप मिळण्याचे संकेत आहेत.
विधेयक पास होईल, त्यानंतर त्याचा अध्यादेश आणि त्यासंदर्भातील आरक्षण टाकण्याची पद्धतही निश्चित होईल. त्याची अंमलबजावणी पुढील निवडणुकीपासून होणार की २०२९ वर्ष उजाडणार, याविषयी स्पष्टता नाही; पण जिल्ह्यातील किमान तीन विधानसभा मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित राहतील, असा अंदाज आहे.
२०२४ च्या विधानसभेच्या रिंगणात चार महिला उतरण्याची शक्यता आहे. त्यात कोल्हापूर उत्तरमधून विद्यमान आमदार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) व माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरिमाराजे (Madhurimaraje) यांच्या नावांची चर्चा आहे. विद्यमान आमदार म्हणून श्रीमती जाधव उमेदवारीच्या हक्कदार असतील. या मतदार संघाच्या २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवार नव्हता, त्याचवेळी मधुरिमाराजे किंवा मालोजीराजे यांनी रिंगणात उतरावे, यासाठी प्रयत्न झाले होते; पण घरातूनच विरोध झाल्याने त्यांच्या कुटुंबातील उमेदवार दिसला नाही.
मग भाजपकडे उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेल्या उद्योजक कै. चंद्रकांत जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. कै. जाधव यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री जाधव विजयी झाल्या. या पोटनिवडणुकीपासूनच छत्रपती घराण्याने रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. श्रीमती जाधव यांच्या विजयानंतर त्यांच्यापेक्षा मधुरिमाराजे यांचीच निघालेली जल्लोषी मिरवणूक हे त्याचे संकेत होते. प्रत्यक्षात रिंगणात कोण असेल याविषयी उत्सुकता आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात माजी आमदार महादेवराव महाडिक व काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या वादामुळे नेहमीच राजकीयदृष्ट्या धगधगत राहिलेल्या कोल्हापूर दक्षिणमधून यावेळी शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांना भाजपकडून रिंगणात उतरण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसे झाल्यास ही लढतही चुरशीची होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर चंदगडचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चंदगडची राजकीय समीकरणे बदलणार असून, त्यातून माजी आमदार संध्यादेवी कुपेकर पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
२५ ऑगस्टला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांची श्रीमती कुपेकर यांनी भेट घेतली, त्यावेळी श्री. पवार यांनीच त्यांना ‘तयारी लागा’ असा कानमंत्र दिला आहे. २०१९ च्या निवडणुकीत आश्चर्यकारकरीत्या श्रीमती कुपेकर रिंगणाबाहेर राहिल्या होत्या. आता त्यांच्या रूपाने चंदगडमध्ये राष्ट्रवादीला प्रबळ उमेदवार मिळण्याची शक्यता आहे.
लोकसभा व विधानसभेत महिला आरक्षणाची अंमलबजावणी २०२४ च्या निवडणुकीपासूनच झाली, तर मात्र ज्या मतदार संघावर महिला आरक्षण त्या मतदार संघात विद्यमान आमदारांच्या कुटुंबातील महिलाच रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना रिंगणात उतरून ‘रिस्क’ घेण्याची तयारी नेतृत्वाकडून दाखवली जाणार नाही. त्यामुळे याठिकाणीही पुन्हा घराणेशाहीच डोके वर काढणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.