आळसंद : खानापूर, कडेगाव, पलूस तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या जाधवनगर (ता. खानापूर) येथील अंजना शिंदे, अर्चना पवार या नणंद-भावजयीने पारंपरिक शेतीला आधुनिकतेची झालर दिली आहे. आधुनिकतेच्या जोरावर मोडलेला संसार पुन्हा सावरला आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर त्यांनी मुलांना उच्च शिक्षण दिले आहे. जाधवनगरमधील ‘त्या’ दोघी आधुनिक शेतीच्या मॉडेल बनल्या आहेत.
अंजना यांच्या वडिलांकडे दोन-अडीच एकर शेती; तीही कोरडवाहू. ओसाड माळरान. अंजनाताई दहावीला असताना वडिलांचे छत्र हरपले. येणाऱ्या संकटांना अंजनाताई डगमगल्या नाहीत. उलट संकटांवर पाय देऊन उभ्या राहिल्या. त्या बारावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या. पुढे शिकण्याची इच्छा असताना मध्येच त्यांचे लग्न झाले. एक मुलगा झाला. मात्र संसार फार काळ टिकला नाही. पुन्हा माहेरी परतल्या त्या कायमच्या.
दरम्यान, भाऊ विद्यासागर यांचे अपघाती निधन झाले. कुटुंबावर जणू एकामागून एक संकटांची मालिका आली. मात्र त्याही परिस्थितीवर मात करून अंजनाताईंनी मोडकळीस आलेली शेती करण्यासाठी कंबर कसली. ओसाड माळरान शेत दोन वेळा नांगरून घेतले. मोठमोठे दगडगोटे बाहेर काढले. कर्ज काढून विहीर खोदली. तिला पुरेसे पाणी लागले. विहिरीच्या उपलब्ध पाण्यावर नणंद भावजयांनी पारंपरिक शेतीला छेद आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांनी उसाचा मळा फुलवला. अडीच एक रानात फेरपालट करीत आडसाली लागण करतात. पाचफूट सरी, अडीच फूट अंतरावर लागण करतात.
दोन सरीमध्ये आंतरपीक म्हणून भुईमूग घेतात. उसाला ठिबक सिंचनाद्वारे पाणी देतात. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खते वापरतात. गुंठ्याला सरासरी अडीच टनाचे उत्पन्न मिळते. अंजना, अर्चना या घरीच उसाची रोपे तयार करतात. त्यांना मुलगा संकेत याची मदत होते. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर अंजना यांनी मुलगा संकेत याला उच्च शिक्षण दिले आहे. तो अॅग्रीकल्चर झाला. अर्चना यांची दोन्ही मुले उच्च शिक्षण घेत आहेत. अंजना, अर्चना यांनी राखेतून फिनिक्स पक्ष्याने भरारी घ्यावी, तशी प्रगती साधली आहे. नणंद-भावजयांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेचा ‘टच’ दिला आहे. तो शेतीमध्ये करिअर करू पाहणाऱ्यांना नक्कीच दिशादर्शक आहे.
आयुष्यात कितीही संकटे आली, तरी त्याला घाबरून घरी न बसता त्यावर पाय देऊन उभे राहिले पाहिजे. शेती परवडत नाही, अशी सर्वत्र ओरड आहे. उपलब्ध पाण्याच्या आधारे योग्य नियोजन केल्यास, स्वत: राबल्यास शेती फायदेशीर आहे. शेतीच देशाच्या प्रगतीचा कणा आहे.
- अंजना शिंदे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.