water pot esakal
कोल्हापूर

VIDEO: घरात खणखणू लागले फोन ; हिरावली सुखाची झोप पाहा व्हिडिओ

आर. के. नगर व मोरेवाडी परिसरातील रात्रीची वेळ. रात्री साडेतीन वाजता अचानक सर्वच घरांतील दिवे लागले. घरांतील फोन खणाणले.

नंदिनी नरेवाडी - पाटोळे

कोल्हापूर : आर. के. नगर व मोरेवाडी परिसरातील रात्रीची वेळ. रात्री साडेतीन वाजता अचानक सर्वच घरांतील दिवे लागले. घरांतील फोन खणाणले. मोरेवाडीतील सोसायट्या आणि काही कॉलन्यांतील जवळपास सर्वजण जागे झाले. लगबगीने कोणी किचनच्या सिंकमधल्या नळाखाली कळशी ठेवली, कोणी बागेतील नळाला बादली लावली. घरात असणाऱ्या प्रत्येक नळाला लावलेले भांडे पाण्याने कधी भरते, याची वाट पाहत असताना डोळे चोळू लागले. अगदी करंगळीएवढ्या पडणाऱ्या पाण्याने तब्बल दहा-पंधरा मिनिटांनी कळशी, बादली भरली. काहींनी पिण्यासाठी पिंपात पाणी ओतले. काहींनी खर्चासाठी साठवून ठेवले. असा हा पाणी भरण्याचा कार्यक्रम चाळीस मिनिटे चालला. घरातील पाणी भरूनही झाले नाही तोवर पाणी गेले. पाणी भरण्यासाठीची ही तारेवरची कसरत गेली कित्येक वर्षे आर. के. नगर व मोरेवाडी परिसरांतील नागरिक करत आहेत.

हा परिसर सधन आणि प्रशस्त. त्यामुळे शहरातील बऱ्याच कुटुंबांनी येथे जागा घेत मोठी घरे बांधली; मात्र संपूर्ण परिसर तहानलेलाच. दिवसाआड येणारे पाणी त्यातही मध्यरात्री, तर कधी पहाटे. निश्‍चित वेळ नसल्याने ज्या रात्री पाणी येते त्या रात्री नळ सोडून ठेवावा लागतो. नळ सुरू आहे म्हणून झोप लागत नाही. उशिरापर्यंत मोबाईल पाहत बसणे किंवा टीव्हीसमोर बसणे अशातून झोप येऊ नये म्हणून काळजी घेतली जाते. एवढं करूनही झोप लागली तर म्हणून शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीला पाणी आलेले तुला आधी कळल्यास मला फोन कर, असे सांगितले जाते. एखादा दिवस पाणी भरले नाही तर पिण्यासाठी पाणी कोठून आणायचे, असा प्रश्‍न पडतो.

पाणी कमी दाबाने असल्याने टेरेसवरच्या टाकीत एक थेंबही पडत नाही. शिवाय दिवसाआड येणारे अपुरे पाणी दीड दिवस पिण्यासाठीही पुरत नाही. खर्चाला पाणी मिळतच नाही. आंघोळ, कपडे धुण्यासाठी, स्वच्छतेसाठी, बागेतील झाडांसाठी लागणाऱ्या पाण्याची तजवीज करण्यासाठी परिसरातील तीन-चार कुटुंबे एकत्र येऊन टॅंकर मागवतात. एका टॅंकरमागे होणारा खर्च पंधराशे रुपये. असे टॅंकर यापूर्वी किती वेळा मागवले, याचा हिशेबच नाही. तसेच ग्रामपंचायतीला पाणीपट्टी द्यावी लागते ती वेगळीच.

पाणी दिवसाआड आले तरी चालेल; मात्र जी चाळीस मिनिटे पाणी सोडतात, ते पुरेशा दाबाने व पूर्ण वेळ सोडा, अशी मागणी येथील महिला करतात. पुरेसे पाणी मिळावे, या मागणीसाठी या महिलांनी एकत्र येऊन रास्ता रोकोही अनेक वेळा केला; मात्र काही फरक पडला नाही. अवेळी आणि अपुऱ्या पाण्यामुळे आमची सुखाची झोप हरवलीच आहे. आता याचा परिणाम आमच्या आरोग्यावर होण्यापूर्वीच नियमित व योग्य पाणीपुरवठा व्हावा, अशी कळकळीची विनंती येथील उमा मिरजे, हेमा काटवे, तसेच नेहा सावंत या महिला करतात.

पिण्यासाठीच नाही; तर झाडांना कोठून घालायचे?

या परिसरातील प्रत्येकाच्या अंगणात, दारात विविध झाडे लावली आहेत; मात्र पिण्यासाठी पाणी मिळत नाही, तर झाडांना कोठून घालायचे? काही जणांच्या दारात कूपनलिका आहेत; मात्र उन्हाळ्यात कूपनलिकेलाही पाणी नसते. त्यामुळे पूर्णतः महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मिळणाऱ्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. पावसाळा, हिवाळ्यात झाडांना कसेबसे पाणी दिले जाते. सध्या मात्र जीवापाड सांभाळलेल्या झाडांची अवस्था बघवत नाही. पाण्याविना झाडे होरपळताना पाहताना सहन होत नसल्याचे रत्ना घोरपडे यांनी सांगितले.

पाण्याच्या बाबतीत दुर्दैवी आहोत. पूर्वी आठ दिवसांतून एकदा पाणी यायचे; पण सध्या दिवसाआड येते तेही पूर्ण क्षमतेने नसते. पाणी ज्या रात्री येते त्या रात्री घरातील कोणीतरी जागे राहावे लागते. जी व्यक्ती जागी राहते तिचा पुढच्या दिवसाचा दिनक्रम बदलतो. शिवाय पित्ताचा त्रास सहन करावा लागतो. एक दिवस आड पाणी सोडा; पण ते पुरेशा प्रमाणात सोडा, अशी मागणी आम्ही नेहमी करतो; पण कोणी दाद घेत नाही.

- मीनल भोसले, सोसायटी नं. ५, आर. के. नगर

दिवसाआड येणारे पाणीही अनियमित आहे. रात्री कधी दीड, कधी अडीच, तर कधी कधी पहाटे चार वाजताही पाणी येते. निश्‍चित वेळ नाही. त्यामुळे पाण्यासाठी रात्र जागूनच काढावी लागते. पाणी येणार म्हणून झोप लागत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या कामावर परिणाम होतो. उन्हाळ्यात पाण्याचा खूप त्रास सहन करावा लागतो. पाणी येणार नसेल तर पूर्वसूचनाही दिली जात नाही. रात्रीची वेळ असल्याने कोणाला फोनही करू शकत नाही.

- मोनिका धर्माधिकारी, सोसायटी नं. ३. आर. के. नगर

Edited By- Archana Banage

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT