कोल्हापूर : उचंगी प्रकल्पग्रस्तांचे म्हणने ऐकूण घेतले आहे. त्यांचे शंभर टक्के समाधान केले जाईल, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. उचंगी प्रकल्पग्रस्तांबाबत पुनवर्सन अधिकाऱ्यांनी कायद्यालाच हरताळ फासल्याची खंत प्रकल्पग्रस्तांनी आज केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक झाली. ग्रामविकासमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के समाधान झाले पाहिजे, यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत.’’
प्रकल्पग्रस्तांच्या वतीने अशोक जाधव म्हणाले, ‘‘मुश्रीफ यांच्यासोबत आज सकारात्मक चर्चा झाली. सात ते आठ मुद्दे उपस्थित केले. या मुद्द्यांचे इतिवृत्त तयार करायचे ठरले आहे. पंधरा दिवसात सकारात्मक निर्णय दिला तरच उचंगी धरणाचे कामाची चर्चा सुरू केले जाईल. आठ ते दहा वर्षापासून उचंगी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ऐरणीवर आहेत. हे प्रश्न तात्काळ सोडवले पाहिजेत, अशी वारंवार मागणी केली जाते. मात्र याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.
चार ते पाच वर्षांपासून ज्या अधिकाऱ्यांवर पुनवर्सनाची जबाबदारी होती त्यांनी महाराष्ट्र पुनवर्सनच्या कायद्यालाच हरताळ फासला आहे. मनमानी पद्धतीने पुनवर्सनाची प्रकरणे पुढे रेटण्याचा प्रयत्न केला होता. पुनवर्सन कायद्यांतर्गत जे हक्क होते, ते हक्क नाकारण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडून झाला आहे. हे सर्व मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले आहे. पुनवर्सन कायद्यांतर्गत जे आहे, त्यानूसारच पूनवर्सन झाले पाहिजे. इतर कोणत्याही नियम अटींबाबत चर्चा केली जाणार नाही. पंधरा दिवसानंतर बैठक घेऊन चर्चा केली जाईल. तोपर्यंत धरणाच्या कामाची चर्चाही करू नये असेही सांगितले आहे.’’अशाक जाधव, सजंय करडेकर, मारुती चव्हाण, प्रकाश पाटील, सुरेश पाटील उपस्थित होते.