कार्यकर्त्यांचा साहेबांवर जीव. कार्यकर्त्यांच्या गाड्यांच्या नंबर प्लेटवर '9292' नंबर अन् "साहेबप्रेमी', उल्लेख चुकत नाही. कार्यकर्त्यांच्या हृदयात घर करून राहिलेला हा नंबर. त्याच्या अंकांची बेरीज चार येते, एवढंच त्याच वैशिष्ट्य. करवीर तालुक्यातील कार्यकर्त्यांची या नंबरला विशेष मागणी आहे. नंबरसाठी वेटिंग करावे लागले तरी बेहत्तर. नंबर मात्र हाच हवा. भले पैसे मोजावे लागले तरी हरकत नाही, असा त्यांचा पवित्रा बदलायला तयार नसतो. त्यांच्या साहेबांमुळे नंबरला वलय प्राप्त झालंय.
साहेबांच्या प्रत्येक गाडीवर हाच नंबर पाहायला मिळतो. हे साहेब म्हणजे अर्थात आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर...!
कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्याचे प्रतिनिधीत्व करण्याचा विधानसभा निवडणुकीतून पी. एन. पाटील
यांना दोनदा मिळालाय. राजकारणातील वाऱ्याची दिशा त्यांनी अनुभवली आहे. कॉंग्रेसवरील त्यांची निष्ठा वादातीत आहे. कार्यकर्त्यांचं बळ त्यांच्या मागे आहे. जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते निवडणुकीत साहेबांसाठी रात्रीचा दिवस करून राबतात. सडोली खालसा साहेबांच मूळ गाव. पाटील कुटुंबाचा बुडका मोठा. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबाला गावात मान. तसा दराराही मोठा. दुचाकीची खरेदी करताना वडील, चुलत्यांनी नंबरासाठी कधी हट्ट केला नाही. मिळालेला नंबर गाडीच्या प्लेटवर लिहिला गेला एवढंच. गावा-गावातल्या समस्या जाणून घेत ते मोठे झाले. भटकंतीसाठी दुचाकीची सोबत होती.
आमदार पाटील यांच्या डोक्यात गाडीला अमूकच नंबर असावा, असा आग्रह नव्हता. मनात आलं म्हणून त्यांनी 9292 नंबरला ग्रीन सिग्नल दिला. राजकारण हा त्यांचा पिंड असल्याने वाड्या वस्त्यांपर्यंत पोचण्याची त्यांची धडपड असते. आमदारकीच्या निवडणुकीत पायाला भिंगरी लावून त्यांनी वाड्या वस्त्या पिंजून काढल्या. आमदार झाल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांना डोक्यावर घेतले. गावा-गावात त्यांचा गट आकाराला आला. तसा गाडीचा नंबरही कार्यकर्त्यांच्या गाडीवर झळकण्यास सुरवात झाली. केवळ गाडीच्या नंबरवरुन कार्यकर्त्याचा गट ओळखता येतो. साहेबांचा मुलगा राहूल व राजेश यांच्या दुचाकी व चारचाकीवरील हा नंबर नजरेत भरतो. साहेबांच्या मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक 9292 असेच आहेत. मुलांनी वडिलांचा हाच कित्ता गिरवलाय.
ज्या कार्यकर्त्याच्या मोबाईलचे शेवटचे चार अंक 9292 तो पी. एन. प्रेमी, असे सांगण्याची गरज उरत नाही. आमदार पाटील यांनी राजकारणातील चढ-उतार अनुभवलेत. कार्यकर्त्यांसाठी ते सबकुछ आहेत. फुलेवाडीतल्या गॅरेजवर त्यांच्या भेटी गाठीसाठी कार्यकर्त्यांचा राबता असतो. गाडीला 9292 नंबर घेतल्याची माहिती देण्याचा अनेकांना मोह आवरत नाही, हे विशेष.
आमदार पी. एन.पाटील म्हणतात, "कार्यकर्त्यांचे माझ्यावर असलेल्या प्रेमाचे प्रतिक हा नंबर ठरलाय. नव्या गाडीवर तोच झळकला पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असते. त्यासाठी पैसे मोजण्याची त्यांची तयारी असते. हा नंबर आता आमच्या घरातील गाड्यांना मिळणे मुश्कील झाले आहे. त्यासाठी वेटिंग करावे लागत आहे.'
संपादन - यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.