घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली अन् पंचक्रोशीतील शेकडो लोक अकिवाटकडे धावले. घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
कुरुंदवाड : कृष्णेच्या महापुरात (Krishna River Flood) अकिवाट (ता. शिरोळ) येथे काल सकाळी साडेनऊच्या सुमारास ट्रॅक्टर ट्रॉलीसह उलटून आठजण बुडाले. महापुरात गावच्या पाणीपुरवठ्याची मोटार सुरू करण्यासाठी, तसेच केळीच्या बागेत कामासाठी हे सर्वजण निघाले होते. या दुर्घटनेत अकिवाटच्या (Akiwat Shirol) सरपंच सौ. वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील (वय ५०) यांचा मृत्यू झाला.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इकबाल बैरागदार (५५) आणि गावचे माजी सरपंच अण्णासाहेब सुरेंद्र हसुरे (५५) पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत या दोघांचा शोध लागलेला नव्हता. उर्वरित पाचजण बचावले आहेत.
महापुरात बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ, वजीर रेस्क्यू फोर्स व व्हाईट आर्मीचे पथक यांनी दिवसभर अथक प्रयत्न केले. या पथकांनी सहा बोटींतून नदीपात्रातील कोपरा न् कोपरा शोधला. दरम्यान, या दुर्घटनेमुळे अकिवाटवर शोककळा पसरली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देऊन शोधकार्याचा आढावा घेतला. पालकमंत्र्यांनी मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत जाहीर केली आहे. नृसिंहवाडीपासून दहा किलोमीटरवर अकिवाट आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : अकिवाट ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठ्याचे जॅकवेल व मोटर बस्तवाड हद्दीतील कृष्णा नदीकिनारी आहे. महापुरामुळे गावाचा पाणीपुरवठा काही दिवसांपासून बंद आहे. आज पुराचे पाणी ओसरत असल्याने पाणीपुरवठा सुरळीत करता येईल का, याची चाचपणी करण्यासाठी सरपंचाचे पती सुहास पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रेणिक चौगुले, अरुण कोथळी व पाणीपुरवठा कर्मचारी सागर माने यांच्यासह बस्तवाड फाट्याजवळ थांबले होते. तोपर्यंत तेथे माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार आले.
सगळेच मग बस्तवाडच्या दिशेने जात असतानाच माजी सरपंच अण्णासाहेब हसुरे ट्रॅक्टर-ट्रॉलीसह केळीच्या बागेकडे निघाले होते. ट्रॅक्टर रोहिदास माने चालवित होते. त्यांच्यासोबत केळी व्यापारी अंगद मोहिते व अझहर आलासे (दोघे रा. खिद्रापूर) होते. हसुरे यांनी सुहास पाटील यांना पाण्यातून कशाला जाता, ट्रॅक्टरमध्ये बसा, पुढे सोडतो असे म्हटले. आठजण ट्रॅक्टरमध्ये बसले. ट्रॅक्टर बस्तवाडच्या दिशेने जात होता. जेमतेम शंभर फूट पुढे गेले. पुरामुळे रस्त्याची बाजूपट्टी खराब झाल्याने पडलेल्या खड्ड्यात ट्रॅक्टरचे मोठे चाक अडकले व पाण्याच्या प्रवाहात ट्रॅक्टर ट्रॉलीसह कोसळला.
ट्रॅक्टरमधील आठहीजण पाण्यात पडले. सगळ्यांना पोहता येत होते; मात्र अचानक नदीत ट्रॅक्टर पडल्याने सगळेजण घाबरले. काहीजण कसेबसे पोहत होते; मात्र सुहास पाटील गटांगळ्या खाऊ लागले. दरम्यान, नुकतेच मासेमारी करून गेलेले आनंदा बागडी, ओंकार बागडी व अरुण कांबळे घटनास्थळाकडे धावले व मोठ्या धाडसाने त्यांनी सुहास यांच्यासह अन्य पाचजणांना बाहेर काढले. सुहास यांची स्थिती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
खिद्रापूरचे मोहिते व आलासे पोहत सुखरूप किनाऱ्यावर आले; मात्र बैरागदार व हसुरे दोघेजण पाण्याच्या प्रवाहात कुठेच दिसेनासे झाले. दोघेही पोहत असल्याचे सांगण्यात येत होते; मात्र संध्याकाळपर्यंत त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, घटनेची माहिती समजताच प्रशासनाची प्रचंड धावपळ उडाली. तलाठ्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाने शोध मोहिमेसाठी तत्काळ एनडीआरएफ, वजीर रेस्क्यू फोर्स व व्हाईट आर्मीला पाचारण केले. सात यांत्रिक बोटीतून साठहून अधिक जवानांनी राजापूर (ता. शिरोळ), मंगावती, जुगुळ (ता. कागवाड) ते अगदी कल्लोळ (ता. चिक्कोडी) पर्यंत कृष्णेच्या पात्रात कोपरान् कोपरा शोधला; मात्र दोघांचा शोध लागला नाही.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली अन् पंचक्रोशीतील शेकडो लोक अकिवाटकडे धावले. घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. माजी आमदार उल्हास पाटील, गणपतराव पाटील, संजय पाटील यड्रावकर, माधवराव घाटगे, सावकर मादनाईक, संजय दादा पाटील यांच्यासह विविध प्रमुखांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, सायंकाळी उशिरा सुहास पाटील यांच्यावर गावात अंत्यविधी करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सून असा परिवार आहे.
दुर्घटनेचे ठिकाण अकिवाट ते बस्तवाड मार्गावर आहे. अकिवाट गावाला कृष्णेतून पाणीपुरवठा होतो. अकिवाटचे जॅकवेल उपसा केंद्र बस्तवाड मार्गावरील कृष्णाकाठावर आहे. अकिवाटपासून जेमतेम किलोमीटरवर असलेल्या केंद्रावर पोहोचण्यासाठी एक ओढा ओलांडावा लागतो. अकिवाट गावालगतच हा विस्तीर्ण ओढा आहे. महापुराच्या काळात या ओढ्यात मोठ्या प्रमाणात पाणी येते. येथून राजापूर पुढे टाकळी खिद्रापूर ते टाकळी चंदूर (कर्नाटक) पर्यंत महापूराचे पाणी पसरते. या भागात मोठ्या प्रमाणात झाडी झुडपे आहेत. महापुरात साधारणतः एक किलोमीटरपर्यंत पाणी पसरते. पाण्याला वेगही खूप असतो. त्यामुळे नियमितपणे मासेमारी करणाऱ्यांव्यतिरिक्त या भागातील कोणी पूराच्या पाण्यात उतरण्याचे धाडस करीत नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.