कुरुंदवाड (कोल्हापूर) : शिवसेना शिरोळ उपतालुकाप्रमुख युवराज घोरपडे यांच्या अंगावर आज अनोळखींनी ज्वालाग्राही पदार्थ ओतला. कुरुंदवाड पोलिस ठाण्यासमोर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी घोरपडे आणि विरोधी गटाचे समर्थक पोलिस ठाण्याजवळच समोरासमोर आल्याने तणाव वाढला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. या प्रकरणाबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात परस्पर फिर्यादी देण्याचे काम सुरू होते. अपर अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, असे सांगत जमावाला
शांत केले.
कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत येरावडे यांनी सांगितले, की सोशल मीडियावर टाकलेल्या मजकुरावरून हा वाद उफळला आहे. या मजकुराविरोधात शिवसेनेने काल कुरुंदवाड पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला होता. या प्रकरणाचा राग मनात धरून माझ्या दत्तवाड येथील हॉटेलवर आज दगडफेक केल्याची व त्यात तिघे जखमी झाल्याची तक्रार देण्यासाठी घोरपडे पोलिस ठाण्यात आले. त्याचवेळी विरोधातील गटही तेथे आला. घोरपडे तक्रार देऊन बाहेर पडत असतानाच अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या अंगावर ज्वालाग्राही पदार्थ टाकला.
दरम्यान, पोलिस ठाण्यासमोरच हा प्रकार घडल्याने तणावपूर्ण वातावरण बनले होते. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलिस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, जयसिंगपूर पोलिस उपअधीक्षक रामेश्वर वैंजणे, हुपरीचे सहायक निरीक्षक राजेंद्र मस्के, जयसिंगपूर सहायक निरीक्षक दत्तात्रेय बोरीगिड्डे, शिरोळचे सहायक निरीक्षक शिवानंद कुंभार आदी अधिकारी फौजफाट्यासह दाखल झाले.
दरम्यान, हा सर्व घटनाक्रम समजताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख वैभव उगळे, जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील, कुरुंदवाड शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे, जिल्हा संघटका मंगलताई चव्हाण, वैशाली जुगळे, अप्पासाहेब भोसले, राजेंद्र बेले, संतोष नरकेसह शिवसैनिक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यासमोर आले होते. त्यांनी संबंधितांना ताब्यात देण्याची मागणी केली.
कुरुंदवाड पोलिस ठाण्याकडून कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर जाऊ नये म्हणून शिरोळ, इचलकरंजी, जयसिंगपूर, हुपरी आदी ठिकाणाहून पोलिस फौजफाटा मागवण्यात आला होता. दरम्यान, शहरात व दत्तवाड परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.