मानाची गदा मिळविलेल्या पैलवानांना नाही नोकरी; राज्य सरकारने पावले उचलण्याची गरज
कोल्हापूर : महाराष्ट्र केसरीचे (maharshatra kesri) ‘टायटल’ मिळवून धन्यता मानण्यात पैलवान दिवस ढकलत आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे दरवर्षी मैदान भरविण्याची परंपरा अखंडित असली, तरी पैलवानांची दखल कोणी घ्यायला तयार नाही. मानाची चांदीची गदा मिळविलेल्या पैलवानांचे भवितव्य अधांतरी आहे. राज्यातील जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करत पैलवान महाराष्ट्र केसरीची गदा मिळण्यासाठी उत्सुक असतात. त्याची झलक अंतिम लढतीच्या ईर्ष्येत पाहायला मिळते. गदा मिळविल्यानंतर मात्र त्यांच्या भवितव्याचा विचार केला जात नाही. याउलट, हरियाणामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत पदक मिळविल्यानंतर खेळाडूंना कॉन्स्टेबल, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला पोलिस उपनिरीक्षक, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्याला क्लास वनची नोकरी दिली जाते.
महाराष्ट्रात ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजेता विजय चौधरी नोकरी मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. विशेष तरतूद करत त्याची पोलिस उपाधीक्षकपदी नियुक्ती केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळविणारा राहुल आवारे पोलिस उपाधीक्षक झाला आहे. त्याने वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सातवेळा पदक मिळवले आहे. नरसिंह यादव राष्ट्रकुल, एशियन स्पर्धेतील विजेता व ऑलिंपिक स्पर्धेत उतरल्याने तोही नोकरी मिळविण्यात यशस्वी ठरला. महाराष्ट्र केसरी गदा मिळविणाऱ्या पैलवानांबाबत मात्र असा न्याय केला जात नाही. शासनदरबारी त्यांची नोकरी देण्याकरिता दखल घेतली जात नाही. मंत्र्यांच्या उपस्थितीत चांदीची गदा देण्याचा सोपस्कार मात्र थाटात उरकला जातो. या पैलवानांना नोकरी देण्याचा विचार करण्यात यावा, अशी मागणी कुस्ती क्षेत्रातील जाणकारांतून पुढे येत आहे.
१९८२ ला मी महाराष्ट्र केसरी झालो. त्यावेळी साडेतीन किलोची चांदीची गदा मिळाली. त्या वेळी रोख रक्कम देण्याची पद्धत नव्हती. शेतकरी म्हणून मला जगावे लागत आहे. महापुरात ऊस बुडाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. ही व्यथा माझ्यासारख्या एका महाराष्ट्र केसरी पैलवानाची आहे. शासनाने यापुढे तरी महाराष्ट्र केसरी होणाऱ्या पैलवानाला नोकरी देण्यासाठी पावले उचलावीत.
- संभाजी पाटील-आसगावकर, महाराष्ट्र केसरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.