पुराच्या कालावधीत नागरी वस्तीत वारंवार पाणी शिरुन होणारे नुकसान टाळण्यासाठी पुनर्वसनाचा पर्याय यापूर्वीच पुढे आला आहे.
निपाणी : अतिवृष्टीसह पुराचा निपाणी तालुक्यातील (Nipani Flood) अनेक गावांना फटका बसला असून, हजारो पूरग्रस्तांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. लोकवस्तीत पाणी शिरल्याने काही गावांतील पूरग्रस्त शासन, प्रशासनाविरोधात संतापले आहेत. हुन्नरगी (ता. निपाणी) येथील पूरग्रस्तांनी तर तहसीलदार एम. एम. बळीगार यांना घेराओ घालून विचारणा केली आहे. पूरग्रस्तांनी आमचे कायमचे पुनर्वसन कधी? असा सवाल केला आहे.
यामुळे तालुक्यात पुन्हा पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. पूर आल्यावर तालुक्यातील हुन्नरगी, सिदनाळ, जुने ममदापूर, भोज, कुन्नूर, मांगूर, जत्राट, भिवशी, बुदिहाळ, यमगर्णी, कुन्नूर, कोडणी, कुर्ली आदी गावांना पुराचा पहिल्यांदा विळखा बसतो. त्यामुळे पूरग्रस्तांना संकटाचा सामना करावा लागतो. २०१९ मध्ये महापुरावेळी यासह अनेक गावांत मोठे नुकसान झाले.
हजारो घरे जमीनदोस्त झाली, हजारो संसार वाहून गेले. पुराच्या कालावधीत नागरी वस्तीत वारंवार पाणी शिरुन होणारे नुकसान टाळण्यासाठी पुनर्वसनाचा पर्याय यापूर्वीच पुढे आला आहे. ज्यावेळी महापूर आला, त्यावेळी कायमस्वरुपी पुनर्वसनाचा विषय अनेकवेळा चर्चेत येऊन गेला आहे. पण अद्याप पूरग्रस्तांचे पुनर्वसन होताना दिसत नाही. काही गावांत पूरग्रस्तांना पर्यायी जागा देण्यात आली आहे. पण तेथे आवश्यक सोयी-सुविधांची पूर्तता न झाल्याने नागरिक आपले ठिकाण सोडण्यास तयार नाहीत. काही कुटुंबानी पर्यायी ठिकाणी जागा मिळविल्या असून, मूळ गावात वस्तीस कायम आहेत.
परिणामी पूर, महापुराची स्थिती उद्भवल्यावर पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येतो. पूर ओसरला की पुन्हा संकटग्रस्त नागरिकांची पावले घराकडे वळतात. परिणामी हा प्रश्न रेंगाळला आहे. हुन्नरगी, कारदगा, बारवाड, भिवशी, सिदनाळसह नदीकाठावरील गावात पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. पूरकाळात नदीकाठावरील लोकांचे सरकारी निवारा केंद्रात स्थलांतर होते. पण तेथे सुविधा मिळत नसल्याने अनेकजण पाहुणे, नातेवाईकांकडे जातात. पूर येईल तेव्हा राजकीय नेते, कार्यकर्ते भेटी देऊन पुनर्वसनाचे आश्वासन देतात, पण प्रत्यक्षात पुनर्वसन रेंगाळले आहे. नदीकाठावरील लोकांच्या जिवाला धोका कायम आहे.
पूर येईल त्यावेळी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी भेट देऊन पुनर्वसनाची आश्वासने देतात. पूर ओसरल्यावर आश्वासने हवेत विरुन जातात. आम्हाला तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था नको, कायमस्वरुपी पुनर्वसन पाहिजे. प्रशासन, शासनाविरोधात ग्रामस्थ संतप्त आहेत. हुन्नरगीत जवळपास चारेशहून अधिक कुटुंबीयांचा प्रश्न गंभीर आहे.
-माणिक पाटील, पूरग्रस्त, हुन्नरगी
पूरग्रस्तांची कायमस्वरुपी पुनर्वसनाची मागणी आहे. पूर ओसरल्यावर त्याबद्दल बैठक घेऊन पुढील रितसर कार्यवाही होईल. सध्या पूरस्थिती नियंत्रणावर प्रशासन लक्ष ठेवून आहे.
-एम. एन. बळीगार, तहसीलदार, निपाणी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.