बांबवडे (कोल्हापूर) - चरण (ता. शाहुवाडी) येथील अमित साळोखे अमर रहेच्या घोषणेत केंद्रीय राखीव पोलिस दलातील अमित साळोखे पंचत्वात विलीन झाले. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. दोन वर्षाची मुलगी आस्थाने त्यांना मुखाग्नी दिला.
आज सायंकाळी सहा वाजता अमित यांचे पार्थिव त्यांच्या जन्मगावी चरण येथे दाखल झाले. ते केंद्रिय राखीव पोलीस दलात २००९ ला दाखल झाले. मध्य प्रदेश बालाघाट येथे सेवेत असताना गुरुवारी सायंकाळी वीर जवान अमित साळोखे यांचे सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. ते बालाघाट मध्य प्रदेश येथे केंद्रीय राखीव पोलिस १२३ बटालियनमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.
सकाळपासूनच संपूर्ण गाव पार्थीवाची वाट पाहत होते. परंतु अंतर जास्त असल्याने सायंकाळी उशिरा पार्थिव चरण या गावी दाखल झाले. सात वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय राखीव दलाच्या बटालियनच्या वतीने अमित यांना मानवंदना दिली.
यावेळी पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अमित माळी, शाहुवाडी तहसीलदार गुरु बिराजदार, सीआरपीएफचे मेजर एम. एस. लॉरेन्स बागे, सुभेदार मेजर राजेंद्र राम, पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील, कर्णसिंह गायकवाड, जि प चे बांधकाम समितीचे सभापती हंबीरराव पाटील, सभापती सुनीता पारळे, सरपंच वनश्री लाड, सुरेश पारळे, के. एन. लाड यांच्या वतीने ही पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यांच्यासह चरण गावच्या ग्रामस्थांनी अमित यांचे अखेरचे दर्शन घेतले.
एस.एम. लाॅरेन्स बागी यांनी तिरंगा ध्वज व अमित यांचा फोटो त्यांचे वडील भगवान साळोखे यांच्याकडे दिला. अमित यांच्या पश्चात आई -वडील, बहीण, पत्नी दोन वर्षाची मुलगी असा परिवार आहे.
दोन दिवस व दोन रात्री अखंड प्रवास करून अमित यांचे पार्थिव आणणाऱ्या अधिकारी व तुकडीतील जवानांच्या राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था हॉटेल टर्निंग पॉईंटचे चालक संजय भोसले यांनी केली.
यावेळी दक्षिण महाराष्ट्र माजी सैनिक संघटना अध्यक्ष लक्ष्मिकांत हांडे, निवृत्त सुभेदार बि.जी. पाटील, चंद्रहार पाटील, प्रवक्ता, निवृत्त सुभेदार तुकाराम जाधव माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.