नानीबाई चिखली (कोल्हापूर) - वर्षभरापूर्वी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या बेसुमार पावसामुळे वेदगंगा नदीला महापूर आलेला होता. अंगावर शहारे आणलेल्या महापूराने नदीकाठच्या दोन्ही बाजूला सुमारे तीन किलोमीटरच्या परिसरात अक्षरश: थैमान घातलेले होते. अनेक गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. हजारो लोकांना स्थलांतर व्हावे लागले तर मुक्या जनावरांना सोडून द्यावे लागले होते. महापूराच्या धक्यानं तर एकाला आपला जीव गमवावा लागला होता. गेले चार दिवस पडत असलेल्या पावसामुळे वेदगंगेचे पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडल्याने वर्षभरापूर्वीच्या याच महापुरातील आठवणींनी वेदगंगा नदीकाठ धास्तावला गेला आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कागल तालुक्याची जीवनदायीनी असलेल्या वेदगंगा नदीने प्रथमच रौद्ररूप धारण करीत अनेक गावांना बेटाचे स्वरूप आणले होते. यामध्ये नानीबाई चिखली, कौलगे, बस्तवडे, आनुर, सोनगे, बानगे, कुरूकली, शिंदेवाडी, मुरगुड, चिमगाव, कुरणी याचबरोबर कर्नाटकातील बुदीहाळ, सौंदलगा, यमगर्णी, कुन्नूर, मांगुर, सदलगा, कारदगा आदी गावांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता. या गावातील जनजीवन संपुर्णपणे विस्कळीत झालेले होते.
महापुराने नदीकाठच्या हजारो हेक्टर जमिनीवरील ऊस, सोयाबीन, भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. महापूरात आठ-दहा दिवस घरे पाण्यातच राहिल्याने कष्टाने फुलविलेले अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले होते. तर कित्येकांना अंगावरील कपड्यानिशी स्थलांतरित व्हावे लागले होते. शेकडो घरांची पडझड झालेली होती तर बहुतांशी घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेले होते. महापुरात ठिकठिकाणचे विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर पाण्याने वेढल्याने गावेच्या गावे अंधारात होती. मुक्या प्राण्यांचे हाल तर डोळ्यांना पहावत नव्हते. बुडालेली घरे भुईसपाट झाल्याने आजही अनेकजण भाड्याच्या घरात राहत आहेत.
याच महापुराच्या कडू गोड आठवणी आजही ताज्या आहेत. या आठवणी निघताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या पावसाने वेदगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडलेली असून पाण्याची पातळी क्षणाक्षणाला वाढत आहे. येत्या पाच सहा दिवसात अशीच परिस्थिती राहिल्यास गेल्यावर्षी सारखा महापूर यायला वेळ लागणार नाही. यामुळेच महापूराच्या या आठवणींनी वेदगंगा नदीकाठ पुन्हा एकदा धास्तावलेला आहे.
पूरग्रस्तांची परिस्थिती जैसे थे...
महापुरात अनेकांच्या घरांची पूर्णतः पडझड झालेली होती. तर हजारो हेक्टरवरील पिके कुजलेली होती. या बदल्यात बहुतांश जणांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळाली तर काहीजण मदतीपासून वंचित राहिले. त्यावेळी पुरग्रस्तांना पुनर्वसनाचा दिलेला शब्द वर्ष झाला तरी प्रशासनाला पुर्ण करता आलेला नाही. त्यामुळे त्यांची परिस्थिती जैसे थे अशीच आहे.
संपादन - मतीन शेख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.