पी. एन. यांनी लोकसभेच्या प्रचारात आघाडी घेतली होती; पण आता तेच विधानसभेच्या रिंगणात नसल्याने त्यांचा राजकीय वारस कोण? याची चर्चा सुरू झाली आहे.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत (Kolhapur Lok Sabha Election) करवीरमधून काँग्रेसचे नूतन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना विक्रमी मताधिक्य दिलेल्या करवीर विधानसभा मतदारसंघात (Karveer Assembly Constituency) दिवंगत आमदार पी. एन. पाटील (P. N. Patil) यांचे राजकीय वारसदार त्यांचे पुत्र राहुल की राजेश याची चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, त्यातून आलेला अनुभव, लोकसंपर्क आणि सहानुभूती पाहता पी. एन. यांचे वारस म्हणून राहुल यांना पसंती मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेसनिष्ठ (Congress) अशी ओळख असलेल्या पी. एन. यांनी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरची जागा काँग्रेसला व शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर करवीरमध्ये प्रचाराचे रान उठवले होते. स्वतःच्या निवडणुकीत ते फिरले नसतील; पण या निवडणुकीत पायाला भिंगरी बांधून त्यांनी मतदारसंघातील गाव नि गाव, वाड्यावस्त्या पालथ्या घातल्या. काँग्रेसचे उमेदवार आणि शाहू महाराज यांच्याशी असलेले त्यांचे घनिष्ठ संबंध यातून पी. एन. यांनी प्रचाराचे रान उठवले.
मतदान झाल्यानंतर या प्रचाराची दगदग सहन न झाल्याने ते आजारी पडले. त्यात १९ मे रोजी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचे निमित्त झाले व त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. उपचार सुरू असतानाच २३ मे रोजी त्यांचे निधन झाले. लोकसभेचा निकाल ४ जून रोजी लागला आणि करवीरमधून शाहू महाराज यांना तब्बल ७१ हजारांचे मताधिक्य मिळाले. या मताधिक्यात सिंहाचा वाटा पी. एन. यांचा होता; पण हा आनंदाचा क्षण पाहायला पी. एन. नव्हते. करवीर व राधानगरीच्या जोरावर शाहू महाराजांचा विजय सुकर झाला; पण या जल्लोषात पी. एन. नसल्याने ‘गड आला, पण सिंह गेला’, अशा प्रतिक्रिया उमटल्या.
स्वतः शाहू महाराज यांनीही अशीच प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती. लोकसभेची निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिली जाते. आता विधानसभेची पोटनिवडणूक अशक्य आहे. ऑक्टोबरमध्येच सर्वसाधारण निवडणुकीसोबत ही निवडणूक होईल. पी. एन. यांनी लोकसभेच्या प्रचारात आघाडी घेतली होती; पण आता तेच विधानसभेच्या रिंगणात नसल्याने त्यांचा राजकीय वारस कोण? याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेच्या संपूर्ण प्रचारात त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे पुत्र राहुल व राजेश आघाडीवर होते.
दोघांनीही मतदारसंघातील काही भाग वाटून घेऊन त्यांना प्रचारात सहकार्य केले. आता राहुल की राजेश विधानसभा लढवणार, याविषयी उत्सुकता आहे. राहुल हे परिते जिल्हा परिषद गटातून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काही काळ काम केले आहे. पी. एन. यांनी सुरू केलेल्या राजीव सूतगिरणीचे ते अध्यक्ष आहेत. पी. एन. यांच्याएवढी नसली तरी काही प्रमाणात मतदारसंघात राहुल यांच्याविषयीही सहानुभूती आहे. राजकीय अनुभवही पाठीशी आहे. त्यामुळे राहुल हेच पी. एन. यांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे.
या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. ९) पी. एन. यांना मानणाऱ्या करवीर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला आहे. मेळावा व शोकसभा असे जरी याचे स्वरूप असले तरी यातच पी. एन. यांच्या राजकीय वारसाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दुपारी १२ वाजता खुपिरे फाट्यावर विठाई-चंद्राई हॉलमध्ये होणाऱ्या या मेळाव्याला प्रमुख नेत्यांना निमंत्रण नाही. फक्त कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. त्यात पी. एन. कुटुंबीयांकडून वारस म्हणून कोणाचेही नाव दिले, तर त्याच्या पाठीशी राहण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.