जयसिंगपूर : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करताच शहरातील काही शाळांनी पाचवीपासूनचे वर्ग सुरू केले आहेत. बहुतांश शिक्षकांनीच कोरोना तपासणी केली नाही शिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडेही गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र शहरातील काही शाळांमध्ये पाहायला मिळत आहे. काही शाळांमध्ये सॅनिटायझरचा पत्ताच नाही तर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या थर्मल टेस्टही केल्या जात नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची कागदी घोडी नाचवणाऱ्या शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाईची मागणी होत आहे. कोरोनामुळे नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे शासनाचे धोरण आहे. डिसेंबरमध्ये नववीपासूनचे वर्ग सुरू झाले. 27 जानेवारीपासून पाचवीपासूनचे वर्ग मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करूनच सुरू करण्याचा शासन आदेश आहे. मात्र, हा आदेशच शहरातील काही शाळांनी धाब्यावर बसवल्याचे चित्र पहायला मिळत आहे. खुद्द शिक्षकांनीच कोविड तपासण्या न करता शाळा भरवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शाळा सुरू करण्याआधी शाळा सॅनिटायझर करण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात मात्र अनेक शाळांनी याकडे दुर्लक्ष केले. शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करण्याबाबतचे स्पष्ट आदेश असताना अनेक शाळांनी केवळ खर्च कोणी करायचा यातून या नियमांकडे दुर्लक्ष केले. शाळेत विद्यार्थी आल्यानंतर त्यांची थर्मल टेस्टही केल्या जात नसल्याचे वास्तवही पुढे आले आहे. एकूणच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून शहरातील काही शाळांकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे.
अशा आहेत मार्गदर्शक सूचना
- शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा निश्चित करणे
- शिक्षकांची कोविड तपासणी करणे
- कार्यगट गठीत करणे, बैठक व्यवस्था
- सोशल डिस्टन्सिंगकरीता विविध चिन्हे व खुणा प्रदर्शित करणे
- शाळेतील कार्यक्रम आयोजनावर निर्बंध
-पालकांची संमती, विद्यार्थी वाहतूक सुरक्षितता
- कोविड प्रतिबंधासाठी जागृती करणे
- विद्यार्थ्यांची उपस्थिती व वैद्यकीय रजा धोरणाबाबत सुधारणा
- माहिती एकत्रिकरण
- वर्गात विद्यार्थी सुरक्षिततेबाबत जागरुकता
- शिक्षक-विद्यार्थ्यांचे सुरक्षित प्रवेश-गमन
मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई करू
शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची गरज आहे. यात कुचराई करणाऱ्यांची गय करणार नाही. शासनाचे नियम न पाळणाऱ्या शाळांना नोटिसा दिल्या जातील. त्यानंतरही त्यांच्यात सुधारणा दिसली नाही तर मात्र संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई करू.
- हणमंत बिराजदार, प्र. प्रशासन अधिकारी, पालिका शिक्षण विभाग, जयसिंगपूर
संपादन - सचिन चराटी
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.