पन्हाळा : कोकणाशी जोडणारा नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग (Nagpur-Ratnagiri National Highway) सुरवातीपासूनच अनेक कारणांनी नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. या महामार्गाचे केर्ले ते नावली या टप्प्याचे काम वाघबीळ घाटात (Waghbil Ghat) युद्ध पातळीवर चालू आहे. येथील कामावेळी घाटात जिथे पुलाचे काम चालू आहे, त्या वळणावर दरीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात उत्खनन केले आहे. रस्त्याला लागून असलेल्या दरीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात ढासळणाऱ्या मातीमुळे भूस्खलन होऊन चालू रस्ता दरीत जाण्याची व हा मार्ग बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नेहमी पावसाळ्यात पुरामुळे बंद होणारा मार्ग यावर्षी मात्र खचल्यामुळे बंद होण्याची व मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम चालू असलेला केर्ले ते नावली या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तर, वाघबीळ घाटाच्या एकाबाजूला खोल दरी आहे. त्यामुळे नेहमीच डोंगरावरून पावसाच्या पाण्याचा मोठा प्रवाह दरीत जात असतो. याच दरीकडील रस्त्याच्या बाजूपट्टीला घासून उतारावर उत्खनन केले आहे.
या उत्खननामुळे चालू रस्त्याच्या बाजूपट्टीचा भाग रस्त्याच्या कडेपर्यंत ढासळला आहे. या भागात सध्या मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे या भागातील डोंगरावरून दरीत जाणारे पाण्याचे प्रवाह जोर धरू लागले आहेत. या व डोंगरात मुरणाऱ्या पाण्यामुळे दरीच्या उतारावरील माती घसरण्याचे प्रमाण वाढणार आहे. भूस्खलन होऊन चालू रस्ता तुटून जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण, या परिसरामध्ये यापूर्वीही वारंवार भूस्खलन झालेलं आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व अवजड वाहतूक चालू असते. नेमके घाटातील सर्वात मोठ्या वळणावरच माती घसरत आहे.
त्यामुळे ढिसूळ झालेला रस्त्याचा भराव अवजड वाहनांमुळे खचण्याचीही शक्यता आहे. यासर्व कारणाने याठिकाणी एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याला धोका पोहचू नये, म्हणून ठेकेदाराने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. तरी संबंधित ठेकेदारांनी तातडीने दरीकडील उत्खनन केलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून घ्यावी व भविष्यातील दुर्घटना टाळावी, अशी प्रवाशी वर्गातून मागणी होत आहे.
वाघबीळ घाटात उत्खनन चालू असलेल्या वळणावर कामावरील माती वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे वळणावरील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत.
वाघबीळ घाटातून जाणारा महामार्ग हा एक महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या इतक्या मोठ्या प्रकल्पच्या संथ गतीने व नियोजनशून्य चालू असलेल्या कामाकडे शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या कामामुळे रस्ता खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ उपाययोजना न झाल्यास वरिष्ठांकडे दाद मागावी लागेल.
-असिफ मोकाशी, माजी नगराध्यक्ष पन्हाळा नगरपरिषद
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.