-राहुल गडकर
कोल्हापूर : किल्ले विशाळगड (Vishalgad) गेल्या महिनाभरापासून वेगळ्याच कारणाने देशभर पोहोचला. मात्र, कोल्हापूर शहरातील न्यू कॉलेजमधील (New College Kolhapur) प्राध्यापक आणि संशोधकांनी विशाळगडाचे नाव सकारात्मक दृष्टीने जगभरात पोहचवले आहे.
किल्ले विशाळगडावर नवीन वनस्पतीचा शोध लागला असून कंदील पुष्प वर्गातील (Kandil Pushpa) वनस्पतीची नवीन प्रजाती आढळून आली असून त्या वनस्पतीला 'सेरोपेजिया शिवरायीना' (Ceropegia Shivarayina) असे नाव देण्यात आले आहे. या संदर्भातील शोधनिबंध न्यूझीलंड येथून प्रकाशित होणाऱ्या फायटोटॅक्सा या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला.
न्यू कॉलेजमधील वनस्पतीशास्त्र विभाग येथील अक्षय जंगम, रतन मोरे व डॉ. नीलेश पवार तसेच चांदवड नाशिक येथील डॉ. शरद कांबळे आणि शिवाजी विद्यापीठामधील प्रा. डॉ. एस. आर. यादव यांच्या चमूने विशाळगडावरून शोधलेल्या कंदील पुष्प वर्गातील वनस्पतीच्या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. सेरोपेजिया शिवरायीना असे या वनस्पतीचे नामकरण करून शिवाजी महाराजांच्या प्रति कृतघ्नता व्यक्त केली आहे.
अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रथमच एका वनस्पतीच्या प्रजातीला संबोधित केले जाणार असून याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञाकडून घेतली जाणार आहे. अक्षय जंगम व डॉ. नीलेश पवार गेली सहा वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यावरील वनस्पतींचा अभ्यास करत आहेत. त्याअंतर्गत काम चालू असताना ऑगस्ट 2023 मध्ये विशाळगडावर कंदील पुष्प वर्गातील एक वेगळी वनस्पती आढळली. भारतामधील कंदीलपुष्प वर्गाचे तज्ञ असणारे मूळचे कोल्हापूरचे पण, सध्या नाशिक येथे कार्यरत असणारे डॉ. शरद कांबळे यांनी या वनस्पतीची सखोल पाहणी केली असता, ही नवीन प्रजाती असण्याची शक्यता व्यक्त केली.
त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. एस. आर. यादव, ज्यांनी या सेरोपेजिया वर्गाला भारतभर एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. ज्यांनी आत्तापर्यंत या वर्गातील ६ नवीन प्रजाती शोधून काढल्या आहेत, त्यांनी अंतिम निरीक्षणानंतर सदर वनस्पती ही नवीन प्रजाती म्हणून घोषित होऊ शकते यावर शिक्कामोर्तब केले आणि त्या संबंधी शोधनिबंध आतंरराष्ट्रीय नियतकालिकात पाठविण्यात आला.
सदर नवीन प्रजातीच्या अधिवासाचा विचार करता गडावर याची संख्या मर्यादित असली तरी आजूबाजूच्या डोंगररांगांमध्ये सुद्धा ही प्रजाती आढळू शकते, अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली. या नवीन प्रजातील महाराजांचे नाव देण्याचे कारण म्हणजे शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ याच सह्याद्रीमध्ये रोवत असताना स्वराज्य रक्षणात गडांचे त्याचबरोबर सभोवतालच्या जंगलांचे महत्व जाणले आणि गडकिल्ल्यांच्या माध्यमातून वनस्पतींसाठी जणूकाही संरक्षित क्षेत्रेच राखीव केली.
एवढेच नव्हे तर आज्ञापत्रात रयतेसाठी "गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी, ते झाडी प्रयत्ने वाढवावी त्यामध्ये येक काठी तेही तोडू न दयावी" असे आवाहन केले. यावरून छत्रपती शिवराय जैवविविधता संवर्धनाच्या बाबत किती अग्रेसर आणि काटेकोर होते हे लक्षात येते. जवळजवळ तीन शतके गुलामगिरीच्या वरवंट्याखाली भरडलेल्या अंधारमय महाराष्ट्रात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या छत्रपती शिवरायांना कंदीलपुष्प कुळातील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला शिवरायांचे नाव देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त संधी आम्हाला मिळाली, असे संशोधकांनी सांगितले. सदर कामासाठी न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, आणि संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.