ठिय्यामध्ये महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेतला होता. तसेच मदरशावरही तो फोटो लावण्याचा प्रयत्न केला होता.
कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहतीतील वादग्रस्त मदरशाचे (Madrasa) अनधिकृत बांधकाम हटवण्यास गेलेल्या महापालिका (Kolhapur Municipality) व पोलिस पथकाला काल (बुधवार) मुस्लिम समाजातील (Muslim Community) महिला, लहान मुलांसह नागरिकांनी तीव्र विरोध करत रोखले. ‘वेळ द्या, अपील दाखल केले आहे,’ असे सांगत जेसीबीसमोर सुमारे पाच तास ठिय्या मारण्याबरोबरच जोरदार घोषणाबाजी केली.
तसेच अधिकाऱ्यांशी हुज्जतही घातल्याने दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत आजपासून बांधकाम उतरून घेण्याचे मुस्लिम समाजाने मान्य केल्याने कारवाई थांबवली. या अनधिकृत बांधकामावर विश्व हिंदू परिषदेच्या तक्रारीनुसार यापूर्वीही दोनदा कारवाईचा प्रयत्न झाला होता.
२७ डिसेंबरला कारवाईस गेलेले महापालिका, पोलिसांचे पथक परत आले होते. आता न्यायालयाने मनाई नामंजूर केल्याने कारवाईसाठी महापालिका व पोलिसांची मोठी यंत्रणा सकाळी सातला लक्षतीर्थ वसाहतीत दाखल झाली. बॅरिकेडस् लावून वाहतूक अडवली. तर चौकांसह रस्त्यांवर ३०० पोलिस बंदोबस्तासाठी होते. महापालिकेची यंत्रणा पोहोचल्यानंतर आधीच मदरशातील नागरिक, महिला, लहान मुले रस्त्यावर आले. थोडा वेळ द्या, न्यायालयात अपील दाखल केले आहे, त्यामुळे कारवाई करू नये, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
न्यायालयाने स्थगिती दिली नसल्याने महापालिका कारवाईवर ठाम होती. त्यामुळे संतापलेल्या तरुणांनी जेसीबीवर चढून घोषणाबाजी सुरू केली. तसेच महिला, मुलांनी रस्त्यावर ठिय्या मारला. पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी विनाकारण तणाव निर्माण करू नये, महापालिकेला कारवाई करण्यास द्यावी, असे सांगत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. नगररचना विभागाचे उपशहर रचनाकार रमेश मस्कर, शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी नेत्यांशी चर्चा केली.
महापालिकेची बाजू मांडणारे ॲड. मुकुंद पवार यांनी न्यायालयातील वस्तुस्थिती सांगताना स्थगिती नसल्याचे यावेळी स्पष्ट केले. त्यानंतर दोन तास द्या, आम्ही स्वतःहून बांधकाम काढून घेतो, अशी मागणी सुरू केली. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांशी जाफर बाबा, गणी आजरेकर, कादर मलबारी, आनंदराव खेडकर, रियाज सुभेदार आदींनी चर्चा केली. यात दोन तासांच्या चर्चेनंतर काही भाग उतरून घेण्यावर एकमत झाले. पण महिला व तरुण आंदोलकांना हे मान्य नव्हते. अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनीही समजावण्याचा प्रयत्न केला.
समाजाच्या नेत्यांनी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असून, त्यातील निर्णयाची प्रतीक्षा करावी, असे आवाहन पोलिसांना केले. रस्त्यावर ठिय्या मारलेल्या महिलांना घरी जाण्यास पोलिसांनी सांगितले. त्यावेळी महिलांनीही महापालिकेची यंत्रणा बाजूला केली तरच परत जाऊ असे सुनावले.
त्यावरून टिके यांच्याशी काहींनी हुज्जत घातल्याने तणाव झाला. अखेर जेसीबी पाठीमागे घेतल्यानंतर महिला रस्त्यावरून उठल्या व मदरशात गेल्या. त्यानंतर सायंकाळपर्यंत पोलिस, महापालिकेचे कर्मचारी तसेच नागरिक त्या रस्त्यावर बैठकीतील निर्णयाची वाट पहात बसले होते. प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक हर्षवर्धन, पोलिस निरीक्षक दिलीप पवार, संजीव झाडे, तानाजी सावंत, रवींद्र कळमकर यावेळी उपस्थित होते.
महापालिकेच्या कारवाईविरोधात जिल्हा न्यायालयात अपील दाखल करून अलिफ अंजूमन मदरसा सुन्नत जमात यांनी मूळ अपिलाच्या निकालापर्यंत महानगरपालिकेने कोणतीही कारवाई करू नये. बांधकामाबाबत जैसे थे स्थिती ठेवावी, अशा मागणीचा अर्ज दाखल केला होता. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. त्यानंतर तो अर्ज नामंजूर केला. महानगरपालिकेच्यावतीने ॲड. प्रफुल्ल राऊत, नगररचनाच्यावतीने ॲड. मुकुंद पोवार यांनी बाजू मांडली.
ठिय्यामध्ये महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेतला होता. तसेच मदरशावरही तो फोटो लावण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी महिलांकडून आक्रमक भूमिका घेतली जात होती. या महिलांनी मदरशात बसूनच दुपारचे जेवण केले. महिलांनी मदरशात जवळपास बारा तास ठिय्या मारून कारवाई रोखली.
महापालिकेने कारवाईसाठी मोठी तयारी केली होती. सकाळी सात वाजता महापालिकेच्या चौकात विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास सांगितले होते. नगररचना व शहर अभियंता कार्यालयाचे सर्व अभियंता, पवडी विभागाचे कर्मचारी, डांबरीचे कर्मचारीही बोलावले होते. त्यासह तीन जेसीबी, दोन डंपर, कॉंक्रिट ब्रेकर, कटर यांसह अग्निशमन दलाचे जवान फायर फायटर वाहनासह उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.