Panchganga Pollution Updates | Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

कोल्हापुर : पंचगंगा बनली विषगंगा

काही वर्षांत याच पंचगंगेकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले... नदीपात्रातील पाणी थेट घेऊन पिण्यासारखी स्थिती नाही...शेकडो मासे मृत्युमुखी पडत आहेत...

ओंकार धर्माधिकारी : सकाळ वृत्तसेवा

देशातील समृद्ध शहर म्हणजे कोल्हापूर. येथे वाहणारी पंचगंगा नदी ही आपली ओळख. पंचगंगेने वर्षानुवर्षे कोल्हापूरकरांची तहान भागवली... पंचगंगेच्या पाण्यावरच येथील शेत-शिवार फुललं, बहरलं...अन् जगणंही विस्तारलं...अनेक पिढ्या याच पाण्यावर वाढल्या...मात्र गेल्या काही वर्षांत याच पंचगंगेकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले... नदीपात्रातील पाणी थेट घेऊन पिण्यासारखी स्थिती नाही...शेकडो मासे मृत्युमुखी पडत आहेत...अनेक जलचरांचा श्‍वास घुसमटत आहे...सर्वच घटकांच्या हलगर्जीपणामुळे एकेकाळी खळाळत वाहणारी निर्मळ पंचगंगा विषगंगा बनली आहे...

जगातील बहुतेक प्राचीन शहरे नदीकाठी वसली आहेत. तेथेच त्यांचा विकास झाला. या नद्यांनी या शहरांना ओळख दिली. पंचगंगा नदी ही कोल्हापूर शहराची मूळ ओळख आहे. अठराव्या शतकामध्ये पंचगंगा नदीच्या काठी झालेल्या उत्खननात हजारो वर्षांपूर्वीचे काही अवशेष सापडले. यामध्ये काही ग्रीक-रोमन साम्राज्यातील वस्तूही सापडल्या. या उत्खननातून ब्रह्मपुरी हा परिसर सापडला. त्याकाळी येथून ग्रीक आणि रोमन साम्राज्याशी व्यापार चालत असल्याचे पुरावे मिळाले. पंचगंगा नदी या साऱ्या इतिहासाची साक्षीदार आहे. राधानगरीतून येणारी भोगावती, तुळशी आणि धामणी तर गगनबावड्यातून येणारी कुंभी आणि शाहूवाडीतून येणारी कासारी या पाच नद्यांचा संगम प्रयाग येथे होतो आणि पंचगंगा नदीचा उगम होतो. शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे पंचगंगा कृष्णेच्या प्रवाहात मिसळते. एकूण ८१ किलोमीटर लांबीच्या या नदीने कोल्हापूर जिल्ह्याची एक बाजू सुजलाम्‌ सुफलाम्‌ केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रयत्नातून राधानगरी धरण बांधले गेले. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था झालीच; पण नदीकाठी शेतीही फुलली. या पाण्यामुळेच परिसरात उसाचे पीक घेतले जाऊ लागले. सहकारी साखर कारखान्यांनी ग्रामीण भागात सुबत्ता आणली. पंचगंगा नदीचे असंख्य उपकार या जिल्ह्यावर आहेत; पण आपण मात्र कृतघ्न ठरलो. निसर्गाने दिलेली ही अनमोल ठेव आपण सांभाळू शकलो नाही. नदीकाठची गावे, कोल्हापूर आणि इचलकरंजी या शहरांनी पंचगंगेला विषगंगा बनवले. त्यामुळेच गेल्या पाच महिन्यांत नदीमध्ये चार ठिकाणी हजारो मासे मरण पावल्याच्या घटना घडल्या.

पंचगंगेचे पर्यावरणीय महत्त्व

पश्चिम घाटात मुसळधार पाऊस पडतो. पावसाचे पाणी पंचगंगेच्या माध्यमातून कृष्णा नदीत मिसळते...तेथून दक्षिण भारतातील मैदानी प्रदेशात नद्यांमधून हे पाणी पोहोचते. तेथील शेती याच पाण्यावर होते. येथील नद्यांवर बांधलेल्या धरणांमध्ये ते साठवले जाते. पंचगंगेत विविध प्रकारचे मासे, जलचर आहेत. शैवालवर्गीय वनस्पतीही आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीचे पर्यावरणीय महत्त्व अनन्यसाधारण आहे.

अशी झाली प्रदूषणाची सुरुवात

पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न ३३ वर्षांपूर्वी सुरू झाला. १९८९ मध्ये पहिल्यांदा नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे दोन गर्भवती महिला दगावल्या. काविळीची साथ पसरली. त्यानंतर कोल्हापुरात जनआंदोलन उभारले गेले. त्यातून शिंगणापूर योजना सुरू झाली. २९ एम.एल.डी क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प ४१ एम.एल.डीचा केला गेला. तरीही सांडपाणी नदीत मिसळत राहिले. नदी प्रदूषणाची श्वेतपत्रिका काढली गेली ही राज्यातील पहिलीच घटना होती. त्यानंतर महापालिकेवर कारवाई झाली. महापौर, आयुक्तांवर गुन्हे दाखल झाले. इचलकरंजीत दूषित पाण्यामुळे ३८ जणांना जीव गमवावा लागला. जनआंदोलनाच्या रेट्यामुळे नदी प्रदूषणाबाबत उपाययोजना झाल्या खऱ्या, पण लोकसंख्या जशी वाढली तशा या उपाययोजनाही तोकड्या पडू लागल्या आहेत. पर्यायाने नदी प्रदूषणाच्या प्रश्नाने पुन्हा गंभीर स्वरुप धारण केले आहे.

कोल्हापुरातील सांडपाणी थेट पंचगंगेत

शहरामध्ये रोज १२० एम.एल.डी सांडपाणी तयार होते. पूर्वी बारा नाल्यांतून हे पाणी नदीत मिसळत होते. महापालिकेने दुधाळी आणि कसबा बावडा येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले. त्यामुळे १०३ एम.एल.डी. सांडपाण्यावर प्रक्रिया होते. मात्र अद्यापही रोज १७ एम.एल.डी. पाणी थेट नदीमध्ये मिसळते. थेट पाईपलाईन योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील सांडपाण्यामध्ये आणखी वाढ होईल. सध्यातरी महापालिकेने याचा विचार केलेला दिसत नाही.

इचलकरंजीचे चित्र विदारक

इचलकरंजी शहरामध्ये औद्योगिक आणि घरगुती असे सुमारे ५२ एम.एल.डी. सांडपाणी तयार होते. यामध्ये औद्योगिक रासायनिक सांडपाण्याचाही समावेश आहे. यातील बहुतांशी सांडपाणी थेट नदीत मिसळते. इचलकरंजी नगरपालिका सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याबाबत फारशी गंभीर नाही. त्यामुळे इचलकरंजी ते शिरोळ या भागात नदी प्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.

या गावांना समजवायचे कोणी?

पंचगंगेच्या काठी ८५ गावे आहेत. त्यातील ३९ गावांचे सांडपाणी थेट नदीत मिसळते. पूर्वी या गावांची लोकसंख्या कमी असल्याने सांडपाण्याचा आकार कमी होता. मात्र लोकसंख्या वाढल्याने सांडपाणीही वाढले आहे. पर्यायाने नदी प्रदूषणाची पातळी वाढली. ३९ गावांचे क्लस्टर करून तेथे १४ प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत; मात्र त्यांचे आराखडे अद्याप कागदावरच आहेत. कधी जागा नाही तर कधी निधी नाही असा ताकतुंबा करत हे प्रक्रिया प्रकल्प तसेच रखडले आहेत.

पंचगंगेचा स्तर खालावला...

नदीमध्ये रोज सुमारे ९० एम.एल.डी. सांडपाणी प्रतिदिन मिसळते. त्यामुळे नदीच्या पाण्यातील डिझॉल ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले. नदीचे पाणी हिरवे, काळे दिसू लागले. नदीमधील जैवविविधतेवरही याचा परिणाम झाला. अनेक जलचर, दुर्मिळ मासे लुप्त होऊ लागले. नदीमधील दूषित पाणी शेतीला सोडल्याने काही भागात जमिनीचा कस कमी झाला. नदीमधील पाणी दूषित झाल्याने आसपासच्या गावांतील पाणी उपसा बंद करून त्यांना अन्य जलस्त्रोतातून पाणी देण्याची वेळ आली. नदीमध्ये जनावरे, कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या लोकांना त्वचाविकार होऊ लागले. एकेकाळी सगळ्यांची तहान शमवणाऱ्या नदीला आता अवकळा आली आहे. निसर्गाने मुक्तहस्ते दिलेला हा हजारो वर्षांचा ठेवा आपण सांभाळू शकलो नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील सामान्य माणसाचे जीवन आनंदाने फुलवणारी पंचगंगा विषगंगा बनली आहे. ही धोक्याची घंटा असून आता ठोस उपाय केले गेले नाहीत तर आपण पंचगंगेला कायमचे हरवून बसू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT