नेत्यांनी कार्यकर्त्यांनाच बळी दिल्याचे जिल्हा बँकेच्या गेल्या निवडणुकीतही पहायला मिळाले आहे.
कोल्हापूर : निवडणूक मग ती कुठलीही असो त्यात लढायची वेळ आली तर अपवाद वगळता कार्यकर्त्यालाच संधी दिले जाते. पण, जिथे बिनविरोध किंवा चांगली संधी आहे त्याठिकाणी मात्र नेते किंवा त्यांचा नातेवाईकच पुढे केले जातात याची प्रचिती जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही आली. विकास संस्था गटात जिथे निवडणूक बिनविरोध आहे तिथे नेत्यांनी आपलीच उमेदवारी पुढे रेटली. पण, ज्याठिकाणी लढाई लागली तिथे मात्र कार्यकर्त्यांना संधी देण्यात आल्याचे दिसून आले.
यापूर्वी झालेली जिल्हा परिषद निवडणूक असो किंवा चार महिन्यांपूर्वी झालेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीतील उमेदवारी नजर टाकल्यास प्रस्थापित किंवा नेत्यांच्या नातेवाईकांना संधी दिल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेत महेश चौगुलेसारखा आणि ‘गोकुळ’मध्ये बयाजी शेळके, बाबासाहेब चौगले यांच्यासारखे कार्यकर्ते अपवादानेच दिसले. किंबहुना जिथे पराभव निश्चित आहे त्याठिकाणीही नेत्यांनी कार्यकर्त्यांनाच बळी दिल्याचे जिल्हा बँकेच्या गेल्या निवडणुकीतही पहायला मिळाले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बँकेचे अध्यक्ष ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, राजेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील अशी दिग्गज मंडळी बिनविरोध झाली. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी स्वतः निवडणुकीपासून लांब रहात मुलगा माजी आमदार अमल महाडिक यांना बिनविरोध केले. या सर्वांना आपल्या गटातून त्यांच्याकडून एखाद्या कार्यकर्त्याला संधी देणे शक्य होते. पण, तसे झाले नाही. जिल्हा परिषद, पंचायत समितीसह ‘गोकुळ’, जिल्हा बँक यासारख्या संस्थाकडे दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची सोय म्हणून बघितले जाते. पण, अपवाद सोडला तर या संस्थांतही दिग्गज नेते, त्यांचे जवळचे नातवाईक किंवा पत्नी व मुलालाच संधी दिल्याची अनेक उदाहरणे आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समितीचे मतदारसंघ मोठे असतात त्याठिकाणी भरपूर फिरायला लागते. अशा ठिकाणी मात्र कार्यकर्त्याला दावणीला बांधले जाते. जिथे मतदार कमी, निवडून येण्याची शंभर टक्के खात्री आणि पराभूत होण्याचा धोकाच नाही आणि सत्ता मिळाली तर गाव, तालुक्यावर वर्चस्व ठेवण्याची संधी यामुळे अशा ठिकाणी स्वतः नेते किंवा नातेवाईकच हेच उमेदवार ठरलेले असतात, हे पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून स्पष्ट झाले.
गॉडफादर नसलेले रिंगणाबाहेर
जिल्हा बँक असो किंवा इतर मोठी संस्था त्यात ‘गॉडफादर’ नसेल तर रिंगणातून बाहेर फेकले जाते हे विलास गाताडे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, पी. जी. शिंदे, उदयानी साळुंखे आदींना डावलेल्या उमेदवारीवरून स्पष्ट होत आहे. आता स्वीकृतसाठीही नेत्यांच्या जवळचे, मागे-मागे फिरणाऱ्यांची वर्णी लागणार हा इतिहासही ताजा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.