'जिल्ह्यातील काँग्रेसचा एक नेता काही झाले की मीच केले असे सांगून फुले उधळतो.'
कोल्हापूर : महत्त्वाकांक्षी थेट पाईपलाईन योजना (Kalammawadi Dam Pipeline Yojana) पूर्ण होत असून लवकरच घरोघरी या योजनेचे पाणी पोहचेल. शुक्रवारी (ता.१०) आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी थेट पाईपलाईनच्या पाण्याचे पूजन करून स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. त्याला माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आक्षेप घेत माझ्यामुळे योजना सुरू झाली, असा दावा केला.
सतेज पाटील यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले नाही म्हणून शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले (Ravikiran Ingawale) यांनी खेद व्यक्त केला. तर राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी पाणी पूजन करून आपलाही दावा अधोरेखित केला. एकूणच ऐन दिवाळीत थेट पाईपलाईनच्या मुद्द्यावर राजकीय फटाके फुटू लागले आहेत.
‘थेट पाईपलाईनचा पहिला धनादेश कोणी आणला, योजनेसाठी पाठपुरावा कोणी केला, योजनेतील कामाचा आढावा प्रत्यक्ष तेथे जाऊन कोणी घेतला. बैठका कोणी घेतल्या, या सर्वांची जनतेला माहिती आहे. मी श्रेयवादात पडणार नाही. कोल्हापूरकरांची सकारात्मक भावना आणि आई अंबाबाईचा आशीर्वाद यामुळेच ही योजना पूर्ण झाली,’ असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. काल झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, ‘थेट पाईपलाईनच्या तांत्रिक कामातील अडचणींमुळे दहा दिवसांनंतर पाणी आले. ९ वर्षे विरोधकांची टीका सहन करत होतो. सातत्याने पाठपुरावा करून योजना पूर्णत्वास नेल्याचा आनंद आहेच. मला कोणावर टीकाही करायची नाही, पण या योजनेचा पहिला धनादेश कोणी आणला, बैठका कोणी घेतल्या, या सगळ्याची वस्तुस्थिती काय, हे जनतेला माहिती आहे. ही योजना तांत्रिकदृष्ट्याही परिपूर्ण आहे. आज एक पंप सुरू झाला. पुढील दोन दिवसांत उर्वरित पंपही सुरू होतील.
त्यानंतर शहरातील टाक्यांचे कामही लवकरच पूर्ण होऊन नजीकच्या काळातच शहरातील घरोघरी थेट पाईपलाईनचे पाणी पोहोचेल. एक-दोन ठिकाणी जलवाहिनीला गळती असल्याचे समजते; पण त्याची दुरुस्ती होईल. ५३ किलोमीटरची जलवाहिनी आहे. त्यामुळे एक-दोन ठिकाणी असे होणार, तेही दुरुस्त केले जाईल.’ यावेळी आमदार जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, दुर्वास कदम, अश्फाक अजरेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
राजू शेट्टी यांच्या आंदोलनावर बोलताना सतेज पाटील म्हणाले, ‘राजू शेट्टी यांना दिवाळीत आंदोलन करावे लागते, हे चांगले वाटत नाही. यावर्षी यावर तोडगा काढू; पण ऊसदराच्या प्रश्नावर कायस्वरूपी तोडगा काढण्यासाठी दिवाळीनंतर लगेचच काम करणार आहे. त्यामुळे पुढच्या हंगामात आंदोलन करावे लागणार नाही.
‘आता पुढचे लक्ष्य आय.टी.पार्क आहे. शेंडापार्क येथील जागेचा प्रस्ताव पालकमंत्री असताना आम्ही दिला होता. त्याला आता मान्यता मिळाली आहे. येथे आय.टी.उद्योग उभा राहील या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत,’ असे आमदार पाटील यांनी सांगितले. मराठा आंदोलनावर ते म्हणाले, ‘मराठा आरक्षणावर आजपर्यंत सरकार असंवेदनशील होते, आता ते संवादहीन झाले आहे. त्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण कसे देणार, हे जनतेला सांगितले पाहिजे. आजपर्यंत सरकारने मराठा समाजाला फसवायचे काम केले आहे. त्यामुळे मराठा समाजात याचा उद्रेक होत आहे. मंत्रिमंडळातील मंत्रीच आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेऊ लागले आहेत.’
‘थेट पाईपलाईन व्हावी ही ४० वर्षांपासूनची मागणी होती. या योजनेसाठी निधी द्यावा यासाठी विधानसभेच्या पायऱ्यांवर उपोषण करणारा मी पहिला आमदार होतो. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, हसन मुश्रीफ यांनी मला निधी देण्याचे आश्वासन देऊन उपोषण सोडायला लावले. आता योजनेचे श्रेय मात्र काँग्रेसचा नेता घेत आहे. काही झाले तरी मीच केले असे सांगायची त्यांची सवय आहे,’ अशी टीका सतेज पाटील यांचे नाव न घेता करत थेट पाईपलाईन योजनेचे श्रेय माझे असल्याचा दावा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केला.
थेट पाईपलाईनचे पाणी शहरात आल्याचा आनंद त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात साजरा केला यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने जमा झाल्या. त्यांनी येथे ढोल आणि ताशाच्या ठेक्यावर ताल धरला. राजेश क्षीरसागर यांच्यामुळे थेट पाईपलाईन झाली, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी क्षीरसागर म्हणाले, ‘१९८० मध्ये ई वॉर्डात काविळीची साथ आली. त्यानंतर काळम्मावाडी धरणातून थेट पाणी आणण्याची मागणी सुरू झाली.
आजपर्यंत या प्रश्नावर शहरातील एकाही आमदाराने आंदोलन केले नव्हते. मी आमदार झाल्यावर पहिल्यांदा विधानसभेच्या पायऱ्यांवर बेमुदत उपोषण केले. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ यांनी येऊन थेट पाईपलाईनसाठी निधी देतो, असे आश्वासन देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. माझ्या पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाला. त्यानंतरही आमच्या काळात योजनेला निधी मिळाला आहे.
मात्र, जिल्ह्यातील काँग्रेसचा एक नेता काही झाले की मीच केले असे सांगून फुले उधळतो. पाणी कोल्हापुरात पोहोचले ही आनंदाची गोष्ट आहे. पण अजून योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नाही. पुढील काही कालावधीत तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण आणि सक्षमपणे ही योजना सुरू होऊन घराघरांमध्ये पाणी येईल ही आमची जबाबदारी आहे.’ या वेळी किशोर घाटगे, सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, उदय भोसले, अभिजित चव्हाण, सुनील जाधव यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
क्षीरसागर म्हणाले, ‘योजनेचे काम सुरू झाले त्यावेळी तत्कालीन आमदार महादेवराव महाडिक यांनी या योजनेच्या कामात ७५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले होते. त्याचीही शहानिशा करून या भ्रष्टाचाराची ईडी चौकशी करा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहे.’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.