कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा दत्तक घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. जवळपास सर्वच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी यांनी शाळा दत्तक घेतल्या आहेत, मात्र या शाळांचे पुढे काय झाले, याची कल्पना कोणालाच नाही. हा उपक्रम घेण्यापूर्वीच काही सदस्यांनी स्वत:हून दत्तक घेऊन काम सुरू केले आहे. केवळ त्याचीच माहिती पुढे करून उपक्रमाचे गोडवे गायिले आहेत.
नवीन पदाधिकारी आले, की नवीन योजनांची घोषणा करायची, ही जिल्हा परिषदेची परंपरा आहे. काहींनी फक्त साहित्य खरेदी करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. यावेळीही मोठ्या हौसेने शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी जिल्हा परिषद शाळा दत्तक घेण्याची योजना आणली. शाळेचा सर्वांगीण विकास करण्याचा उद्देश असून, या शाळांना सर्व सुविधा दिल्या जातील, अशी घोषणा त्यांनी केली होती, मात्र आतापर्यंत या शाळांकडे काय साधनसामग्री उपलब्ध आहे, कशा पद्धतीने या शाळांचा विकास होणार याचे धोरण मात्र निश्चित झाले नव्हते. शाळा दत्तक योजनेची घोषणा करून चार महिने होत आले आहेत, मात्र या योजनेची प्रगती अजूनही गुलदस्त्यात आहे. केवळ सदस्यांनी शाळा दत्तक घेतल्या आहेत, एवढेच उत्तर सध्या तरी शिक्षण विभागाकडून दिले जात आहे.
कणेरीवाडी शाळेचा कायापालट
कणेरीवाडीची जिल्हा परिषदेची शाळा ही सध्या चर्चेत आहे. जिल्ह्यात मोठ्या पटसंख्येची शाळा म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. विद्यमान जिल्हा परिषद सदस्या शिल्पा खोत व माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी या शाळेचा विकास करण्यासाठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे या शाळेचा कायापालट झाला आहे.
तसेच शिक्षण समिती सभापती प्रवीण यादव यांनीही मिणचे (ता. हातकंणगले) येथील शाळेचा विकास करण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत, मात्र अशाप्रकारे जिल्हा परिषद शाळेचे रुपडे पालटण्याचा प्रयत्न किती सदस्यांनी केला, या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी शिक्षण विभागाकडे नाही.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.