कोल्हापूर : वन्यजीव विभागाच्या वतीने सुरु होत असलेल्या 'जंगल बस सफारी' उपक्रमामुळे राधानगरी अभयारण्यातील पर्यटनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे केले. राधानगरी, दाजीपूर जंगल सफारीच्या उद्देशाने वन्यप्राण्यांच्या चित्रांनी सजविलेल्या बसचे उदघाटन आज पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. 'वन विश्राम गृह' येथे आज सकाळी हा कार्यक्रम झाला. बसची सुरवात बालकल्याण संकुल येथील 15 अनाथ मुलांना मोफत जंगल सफारीचा लाभ देवून करण्यात आली.
यावेळी खासदार संजय मंडलिक, मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, सह्याद्री व्याघ्र राखीव विभागाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक समाधान चव्हाण, विभागीय वन अधिकारी विशाल माळी, तसेच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर मधून निघणाऱ्या 'जंगल सफारी बस' मुळे देश विदेशातून राधानगरी परिसराच्या पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची सोय होईल. तसेच त्यांना अभयारण्यातील जैवविविधता व पशुपक्षी पाहण्याची संधी मिळेल. जंगलामध्ये पर्यटनाच्या हेतूने नवीन ट्रेकरुट व सायकल रुट सुरु होतील याचे नियोजन करा.‘‘
राधानगरी अभयारण्य हे जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असून येथील पर्यटनाला चालना मिळावी. या उद्देशाने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजना आराखड्यात तरतूद करून कोल्हापूर वन्यजीव विभागास 15+2 सीटर बस घेण्यात आली आहे. ही बस आठवड्यातून सहा दिवस बुधवार ते सोमवारी (मंगळवारी सुट्टी) दररोज सकाळी 7 वाजता वन विश्रामगृह, ताराबाई पार्क, नाना नानी पार्क समोर, कोल्हापूर येथून राधानगरी, दाजीपूर पर्यटनासाठी निघेल. एका पर्यटकाला नाममात्र 300 रुपये फी मध्ये एकवेळ चहा, नाश्त्यासह दिवसभर जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे.
राधानगरी अभयारण्यात हत्तीमहाल, फुलपाखरु उद्यान, रौतवादी धबधबा, माळवाडी बोटिंग व दाजीपूर गवा सफारी या सर्व ठिकाणांना भेट देता येणार आहे. आठवड्यातून एक दिवस या बसमधून शासनातर्फे अनाथ, दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी यांना देखील मोफत जंगल सफारी करता येणार आहे. या बसच्या बुकिंगसाठी विभागीय वन अधिकारी(वन्यजीव) यांचे कार्यालय, सिमंतिनी अपार्टमेंट, रमणमळा, कोल्हापूर दूरध्वनीद्वारे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन विशाल माळी यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.