महाडिक  sakal
कोल्हापूर

Rajaram sugar factory election : सतेज पाटील यांचा विजयी वारू रोखला

‘राजाराम’मध्ये महाडिकांनीच पाडला कंडका

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : लोकसभा, विधान परिषद, विधानसभा आणि ‘गोकुळ’पासून उधळलेला आमदार सतेज पाटील यांचा विजयाचा वारू राजाराम कारखान्यात रोखण्यात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह त्यांच्या गटाला यश आले. या निकालाने या दोघांतील संघर्ष अधिक तीव्र होणार असून, त्याचे पडसाद आगामी जिल्हा परिषद, महापालिकेपासून ते लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांत उमटण्याची शक्यता आहे.

महाडिक-पाटील संघर्षाला २००७ पासून सुरुवात झाली. तेव्हापासून संधी मिळेल तिथे या दोन गटांत राजकीय ईर्ष्या टोकाला गेली. २००९ मध्ये कोल्हापूर दक्षिणमधील विधानसभेच्या रिंगणातील सतेज पाटील यांच्याविरुद्ध खासदार धनंजय महाडिक यांच्या लढतीने या ईर्ष्येने टोक गाठले. त्यात निसटत्या मतांनी पाटील यांचा विजय झाल्यावर हा संघर्ष असाच तीव्र होईल ही शक्यता २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत फोल ठरली. आघाडीचे उमेदवार व राज्यात मंत्रिपदावर असल्याने पाटील यांना महाडिक यांना मदत करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यातून महाडिक विजयी ठरले.

त्यानंतर या संघर्षाची धार कमी होईल, असे वाटत असतानाच महाडिक गटाने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अमल यांच्याकडून पाटील यांचाच पराभव घडवून आणला. तेथून हा संघर्ष राजकीय न राहता वैयक्तिक पातळीवर आला. त्यातून मिळेल त्याठिकाणी एकमेकाला शह देण्याचा प्रयत्न झाला. या विधानसभेनंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत स्वतः पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचाच पराभव करून विधानसभेचा वचपा काढला. विधानसभा, ‘गोकुळ’मध्येही विजयाचा वारू पाटील यांनी कायम ठेवला.

आपल्या गावात असलेला ‘राजाराम’ आपल्या ताब्यात नाही. त्यावरील महाडिक यांच्या सत्तेची पाटील यांना सल होती. त्यातून त्यांनी २०१५ पासून ‘राजाराम’साठी संघर्ष सुरू केला. २०१५ मध्ये त्यांना ‘राजाराम’मध्ये निसटता पराभव स्वीकारावा लागला. पण, हार न मानता त्यांनी पुन्हा नव्याने ‘राजाराम’साठी मोट बांधण्यास सुरुवात केली.

राज्यात २०१९ मध्ये अनपेक्षितपणे दोन्ही काँग्रेससह शिवसेनेचे सरकार आले. त्यात पाटील यांना मंत्रिपद मिळाले. या मंत्रिपदामुळे त्यांना अधिकच बळ मिळाले. या जोरावर त्यांनी ‘राजाराम’मधील बनावट व कार्यक्षेत्राबाहेरील सभासद अपात्र ठरविण्याचा विडा उचलला. हा वाद अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला.

पाटील यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चार वर्षांपासून चांगलीच मशागत केली होती. प्रत्येक सभासदाशी वैयक्तिक संपर्क, गावांना मदत या मार्गातून त्यांनी बऱ्यापैकी गट प्रबळ केला होता. पण, ‘राजाराम’ची निवडणूक जाहीर झाली आणि पाटील यांच्या गटाचे २९ ताकदवान उमेदवार अपात्र ठरले. त्याविरोधात त्यांनी न्यायालयीन लढाई दिली.

पण, त्यात त्यांना यश आले नाही. एखादी निवडणूक लढवायची तर त्यात झोकून द्यायचे, स्वतः उमेदवार नसले तरी आपणच रिंगणात असल्यासारखे राबायचे हा पाटील यांचा स्वभाव. त्यानुसार त्यांनी उर्वरित उमेदवारांना घेऊन सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न केला. ‘आमचं ठरलंय, कंडका पाडायचा’, ‘उसाला दर मिळवायचा’ अशा टॅगलाईन वापरून त्यांनी कार्यक्षेत्रात महाडिक यांच्याविरोधात रान उठवले.

गेल्या निवडणुकीत ‘जनसुराज्य’चे आमदार डॉ. विनय कोरे हे पाटील यांच्यासोबत होते. त्यामुळे त्यांचे पॅनेल अवघ्या ५६ ते २०४ मतांनी पराभूत झाले. पाटील यांची विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करताना त्यांनी ‘राजाराम’मध्ये लक्ष घालायचे नाही असे ठरले होते, असा गौप्यस्फोट करून डॉ. कोरे यांनी आपले पाठबळ महाडिक यांच्या बाजूने उभे केले. त्यातून पाटील यांच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह उभे केले. त्यात ‘कंडका पाडायचा’, ‘उसाला दर मिळवायचा’, ‘परिवर्तन करायचे’ यातील हवाच निघून गेली.

त्यानंतर पाटील यांनी भावनिक आवाहन केले. पण, त्याला सभासदांनी साथ दिली नसल्याचे निकालावरून दिसते. गेल्या निवडणुकीतील पाटील यांचे उमेदवार व नेतेही पाटील यांच्यापासून दुरावल्याचे दिसले. दुसरीकडे महाडिक यांना कोरे यांच्यासह आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार निवेदिता माने, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर अशा नेत्यांची साथ लाभली. तरीही पाटील यांनी एकट्याने या सर्वांसमोर आव्हान उभे केले होते. पण, त्यात त्यांना यश आले नाही.

या निवडणुकीत प्रचाराची पातळीही खालावली. ‘राजाराम’वर टीका करताना पाटील यांनी केलेल्या सर्व आरोपांना अमल महाडिक यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यातून ही कुस्ती बिंदू चौकापर्यंत रंगली. त्याचवेळी महाडिक यांच्याकडून ‘डी.वाय.’ कारखान्याच्या वजनकाट्यापासून ते सभासद कमी करण्यापर्यंतचे आरोप झाले. ‘राजाराम’च्या वजनकाट्यावर तर अमल यांनी पाच लाखांचे बक्षीस जाहीर करून आव्हान दिले. या आरोपाला मात्र पाटील यांच्याकडून त्या तुलनेत प्रत्युत्तर देता आले नाही. याउलट त्यांनी ‘राजाराम’ची तुलना जिल्ह्यातील अन्य कारखान्यांशी करून मतदान मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यालाही यश आले नाही.

बालेकिल्ले ढासळले

सतेज पाटील पहिल्यांदा २००४ मध्ये करवीरमधून अपक्ष आमदार झाले. त्या वेळी या मतदारसंघात त्यांना मानणारा प्रबळ गट आजही होता. ‘राजाराम’च्या २०१५ च्या निवडणुकीत या प्रबळ गटामुळेच शिये, भुये, भुयेवाडी, निगवे, वडणगे, प्रयाग चिखली या गावांत पाटील यांना मताधिक्य मिळाले होते. त्याचबरोबर राधानगरी तालुक्यात तर पाटील यांना ८०० मतांची आघाडी मिळाली होती. पण, या वेळी करवीरसह राधानगरीतील पाटील यांचे बालेकिल्लेच ढासळल्याचे त्यांच्या गटाला मिळालेल्या मतांवरून स्पष्ट होते.

‘कुंभी’तील हस्तक्षेपाचा परिणाम

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या कुंभी कासारी कारखान्याच्या निवडणुकीत पाटील यांनी उघडपणे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीला पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत नरके यांच्याविरोधात आमदार पी. एन. पाटील यांना मानणाऱ्या लोकांचे पॅनेल होते. पी. एन. या निवडणुकीपासून लांब असले,

तरी गट म्हणून त्यांचे कार्यकर्ते विरोधी पॅनेलसोबत होते, त्यात त्यांचा पराभव झाला. पण, त्यातून सतेज पाटील यांच्याविषयीची नाराजी स्पष्ट जाणवत होती. ‘राजाराम’ची निवडणूक जाहीर झाल्यापासून यावर सोशल मीडियावर कार्यकर्ते व्यक्त होत होते. वाशी, कांडगाव, शिये, भुये, जठारवाडी आदी गावांत या नाराजीचे प्रतिबिंब उमटल्याचे दिसले. त्यामुळे ‘कुंभी’तील सतेज पाटील यांच्या हस्तक्षेपाचा परिणाम ‘राजाराम’च्या निवडणुकीत झाल्याचीही चर्चा होती.

अनिष्ट प्रथेला खतपाणी

सहकारी संस्था, मग ती कोणतीही असली तर त्यात चाललेला कारभार, त्या संस्थेचे नेतृत्व कोण करते आणि त्याचा सभासदांना किती फायदा होतो, यावरच प्रामुख्याने निवडणूक होत असते. पण, ‘राजाराम’ची या वेळची निवडणूक त्याला अपवाद ठरल्याचे अनेक गावांतील उठलेल्या पंगती, लक्ष्मीदर्शनाच्या सुरू असलेल्या चर्चेवरून स्पष्ट झाले. वाढीव व पात्र ठरलेले सभासद हे जसे सत्ताधाऱ्यांच्या विजयात महत्त्वाचे ठरले, त्याहून अधिक या अनिष्ट प्रथाही विजय-पराभवाला कारणीभूत ठरल्या. सहकारातील या अनिष्ट प्रथा सहकार क्षेत्राच्या वाढीला घातक ठरण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT