बिद्री (कोल्हापूर) : दुधगंगा नदीतून इचलकरंजी प्रस्तावित योजना शासनाने सत्तेच्या जोरावर रेटण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी महामार्ग रोखतील व त्यांच्यासोबत मीही रस्त्यावर असेन, पाणी पुरवठा योजनेस विरोध करण्यासाठी पक्ष, गटतट विसरुन एक होऊया. आपल्या हक्काचे पाणी इतरांना देण्यापेक्षा त्याचे संरक्षण करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. इचलकरंजीला काळम्मावाडीचे पाणी देण्याची योजना रद्द करण्यासाठी शासनाला गुडघे टेकायला भाग पाडूया, यासाठी लोकचळवळ उभी करुया असे मत छत्रपती शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केले.
बिद्री (ता.कागल) येथील दुधगंगा नदीवर इचलकरंजीला पाणी देण्यास दुधगंगा काठ परिसरातील शेतक-यांनी केलेल्या आंदोलन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना बिद्री साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब पाटील म्हणाले, आमच्या हक्काच्या पाण्यासाठी हा लढा असून इचलकरंजीला पाणी दिल्यास दुधगंगा काठावरील शेतीचे वाळवंट होईल. येणाऱ्या तरुण पिढीला पाणी मिळणार नाही. इचलकरंजीला पाणी देण्यास आमचा विरोध असून हे आंदोलन पाण्यासाठी आहे. त्यामूळे यामध्ये राजकारण नको. आमचे हक्काचे पाणी हिसकावून घेणाऱ्यांना लोक माफ करणार नाहीत.
बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विजय मोरे म्हणाले, धरणाच्या मुळ आराखड्याप्रमाणे पाणी वाटप झाले पाहिजे. थेट पाईप लाईन, गैबी बोगदा , आता इचलकरंजी योजना त्यामुळे शेतक-यांनी जायचे कुठे? शेती व शेतकरी टिकायचा असेल तर ही योजना रद्द झालीच पाहिजे. यावेळी सुएश वाडकर , अनिल ढवण, वैभव तशिलदार, शहाजी पाटील , जे. डी. पाटील, प्रभाकर पाटील यांच्यासह विविध शेतक-यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक सुनिल सुर्यवंशी, दत्तात्रय खराडे, वसंत पाटील, वाळवेचे उपसरपंच भरत पाटील, पांडुरंग पाटील, सावर्डेचे सरपंच प्रताप पाटील, बाळासाहेब वारके, अमरसिंह घोरपडे, माजी जि.प.सदस्य अनिल ढवण, अशोक फराकटे, आर. के. पाटील, नाथाजी पाटील यांच्यासह कागल, राधानगरी, भुदरगड, करवीर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.