बिद्री (कोल्हापूर) : कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद रवींद्र पाटील या सात वर्षीय बालकाचा खून झाल्याचे आज उघड झाले. त्याच्या आजोळी सावर्डे बुद्रुक येथे त्याचा मृतदेह सापडला. संशयित म्हणून मुलाच्या वडिलांचाच मित्र दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य ( वय ४५, रा. सोनाळी ) याला या प्रकरणी मुरगूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दोन्ही गावांत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेबाबतचे अद्याप कोणतेही कारण स्पष्ट झालेले नाही.
याबाबत घटनास्थळावरुन व पोलिसांतून समजलेली माहिती अशी,
सोनाळी ( ता. कागल ) येथील वरद रविंद्र पाटील हा सातवर्षीय बालक मंगळवारी सायंकाळी आजोळी सावर्डे बुद्रुक येथे कुटूंबियांसह गेला होता.रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर गेलेला वरद घरी परत न आल्याने नातेवाईंकाकडून परिसरात त्याचा शोध घेतला. परंतू तो न सापडल्याने त्याच्या पालकांनी अज्ञात इसमाविरोधात मुरगूड पोलिसांत अपहरणाची फिर्याद दिली होती.
सावर्डेतील अपहरण झालेल्या बालकाचा खून झाल्याचे स्पष्ट, संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मागील दोन दिवसांपासून पोलिस आणि नातेवाईक वरदचा शोध घेत होते. संशयित दत्तात्रय वैद्य याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपणच वरदचा खुन करुन मृतदेह लपविल्याची माहिती दिली. आज सकाळी आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोध घेतला असता सावर्डेतील लक्ष्मीनगर शेजारील शेतवडीत वरदचा मृतदेह आढळला.वरदचा मृतदेह सापडल्याची माहिती समजताच सोनाळी व सावर्डे येथील ग्रामस्थ व नातेवाईकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती. गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन्ही गावांत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मुरगूड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूरला पाठवत असताना, सावर्डे ग्रामस्थांनी आपल्यासमोर आरोपीला आणल्याशिवाय मृतदेह गावाबाहेर नेवू दिला जाणार नसल्याचे सांगत शववाहिका अडवली. सुमारे तासभर ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी उपविभागीय पोलिस अधिक्षक आर.आर. पाटील, मुरगूडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी आरोपीला कडक शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही देत ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. त्यानंतर जमाव शांत झाला.
दरम्यान घटनास्थळी पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे,अप्पर पोलिस अधिक्षक तिरुपती काकडे यांनी भेट दिली.अधिक तपास विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय किशोरकुमार खाडे,पीएसआय के.डी.ढेरे, बीट अंमलदार सतीश वर्णे, पोलिस नाईक स्वप्निल मोरे, संदिप ढेकळे, राम पाडळकर आदी करत आहेत.
संशयित आरोपी मुलाच्या वडिलांचा जवळचा मित्र
या घटनेतील संशयित आरोपी दत्तात्रय वैद्य हा वरदचे वडिल रविंद्र पाटील यांचा जवळचा मित्र आहे. त्याचे वरदच्या घरी नेहमी येणे जाणे होते. घटनेदिवशी रविंद्र यांच्या सासऱ्यांच्या वास्तूशांती कार्यक्रमालाही तो सावर्डे येथे हजर होता.ओळखीमुळेच वरद, दत्तात्रय याच्यासोबत बाहेर गेला आणि आरोपीने आपला डाव साधला.
नरबळीतून प्रकार घडल्याची चर्चा
मंगळवारी घटना घडल्यापासून वरदच्या नातेवाईकांनी दत्तात्रय वैद्यवर संशय व्यक्त केला होता. दोन दिवसांपासून त्याच्याकडे ग्रामस्थ व पोलिस चौकशी करत होते. दत्तात्रयला गेल्या पंधरा वर्षांपासून मूलबाळ नसल्याने त्याने नरबळीच्या उद्देशाने वरदचा खुन केला असावा असा संशय उपस्थितांतून व्यक्त केला जात होता. परंतू घटनास्थळी असे आक्षेपार्ह काहीच आढळले नसल्याचे किंवा संशयिताने अशी कबुली दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
अन् महिला पोलिसही गहिवरल्या
वरदचा खुन झाल्याची बातमी समजताच घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते.आरोपीला गावात हजर करण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम होते. यावरुन पोलीस व ग्रामस्थ यांच्यात गोंधळाच्या वातावरणात महिला पोलीस जमावाला आवरण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र हे करत असताना त्यांनाही अश्रू अनावर झाले होते.
कुटूंबियांचा आक्रोश ह्नदय पिळवटून टाकणारा
रविंद्र पाटील यांचा मुलगा वरद हा तिसरीत शिकत होता. शांत स्वभावाचा वरद अभ्यासात हुशार होता. शाळेत आणि गल्लीतही तो सर्वांचा लाडका होता. वरदच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या आठवणीने बालसवंगड्यांना अश्रू अनावर झाले होते. वरदच्या आई, वडिल, आजी, आजोबा यांनी फोडलेला आक्रोश उपस्थितांचे ह्नदय पिळवटून टाकणारा होता. वरदच्या पाठीमागे सात महिन्यांचा लहान भाऊ आहे.
आरोपीच्या घराजवळ मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
दरम्यान सकाळी वरदच्या खुनप्रकरणात गावातीलच दत्तात्रय वैद्य याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच सोनाळी गावात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते. मृत वरद आणि संशयिताचे घर जवळच्या गल्लीत असल्याने दोन्ही ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी विशेष दक्षता घेतली होती.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून गंभीर दखल...
दरम्यान वरद पाटील या मुलाचे अपहरण करुन खून केल्याची घटना आज उघडकीस आली. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुरगूडचे सपोनि विकास बडवे यांच्याकडून फोनवरुन या प्रकरणाची माहिती घेतली.हा गुन्हा अत्यंत गंभीर असून माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. गुन्ह्यातील आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्या दृष्टीने तपास करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.