कोल्हापूर : मुलाला जन्मतःच अंधत्व, जसा तो मोठा होऊ लागला तशी त्याची संगीताची जाण वडिलांच्या लक्षात आली आणि हा बाप मग पोराला गायक करायचं, या इच्छेनं झपाटून गेला. अनेक अडचणींवर मात करत या बाप-लेकांचा प्रवास सुरू होता. या प्रवासाचे अनेक साक्षीदार आणि त्यांना पाठबळ देणाऱ्यांची संख्याही मोठी. याच बापाचा हा मुलगा उदयोन्मुख गायक म्हणून नाव कमावत आहे.
तो यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करत असतानाच ९ ऑगस्टला बापाने जगाचा निरोप घेतला. या दुःखातून सावरत मग या मुलानं बाप व आईवर गाणं करायचं ठरवलं आणि जन्माला आलं ‘माझे दैवत माझे बाबा-आई’ हे गाणं. कसबा बीड (ता. करवीर) येथील अंध गायक सिद्धराज पाटील याचं हेच गाणं आता केवळ आठवड्याभरात विविध डिजिटल प्लॅटफार्मवर चांगलंच हिट होत आहे.
सिद्धराजचे वडील अजित पाटील यांनी मुलाला गायक करण्यासाठी केलेली धडपड तशी फार मोठी. मुळात हा माणूस पोरासाठी स्वतः बदलला. पोराचं शिक्षण असो किंवा जिथे जिथे गाण्याचा कार्यक्रम असेल तिथे घेऊन जाण्यापासून ते पोराला जेवण भरवण्यापर्यंत त्यांनी सारं काही केलं आणि एका विशिष्ट टप्प्यावर पोराला स्वतः सर्वत्र जाता यावं, यासाठी त्याला आत्मनिर्भरही बनवलं. पोरानंही बापाच्या कष्टाचं चीज करत एकेक यशाचा टप्पा पार केला. देवल क्लब असो किंवा प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्याकडील शिक्षणापासून ते विविध स्पर्धा, मैफली आणि ‘सारेगमप्’पर्यंत प्रत्येक ठिकाणी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. अनेक बक्षिसांची लयलूट केली. गाण्याच्या शिक्षणाबरोबरच तो सध्या पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.
‘अंतर्यामी स्वामीसमर्थ’ या चित्रपटासाठी त्यानं पार्श्वगायनही केलं आहे. त्याच्या रेकॉर्डिंगवेळीही वडील अजित पाटील उपस्थित होते. पण, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांनी आयुष्याच्या पटावरून कायमची एक्झिट घेतली. या साऱ्या पार्श्वभूमीवर केवळ स्वतःच्याच नव्हे तर प्रत्येक पोराला आपल्या आई-वडिलांविषयी आत्मीयता असायलाच हवी, हा उद्देश घेऊन त्यानं ‘माझे दैवत माझे बाबा-आई’ या गाण्याचा ध्यास धरला आणि तो पूर्णही केला. गायिका हर्षदा परीट हिच्याबरोबर सिद्धराजनं ते गायिलं आहे. संगीतकार संजय साळोखे यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे, तर गीतकार युवराज पाटील यांनी ते लिहिलं आहे. वैशाली पाटील यांची निर्मिती आहे.
ज्यांनी जन्म दिला त्या आई-वडिलांच्या ऋणातून मुक्त होणं अशक्यच. पण, अनाथाश्रमांची वाढती संख्या मनाला वेदना देते. या साऱ्या पार्श्वभूमीवर नव्या पिढीचं व आई-वडिलांतील नातं अधिक घट्ट व्हावं, या उद्देशानं हे गाणं केलं आहे आणि म्हणूनच त्याला प्रतिसाद मिळत आहे.
- सिद्धराज पाटील
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.