Kolhapur : ‘केनवडे येथील तीन मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी येत्या सहा महिन्यांत पूर्ण करू,’ अशी ग्वाही मेघा इंजिनिअरिंगचे प्रकल्प अधिकारी राजशेखर रेड्डी यांनी दिली. केनवडे (ता. कागल) येथे जवळपास १५ एकरांमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या जागेच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. या प्रकल्पामुळे परिसरातील दहा गावांतील शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीजपुरवठा होणार आहे
प्रकल्पचा ठेका मेघा इंजिनिअरिंग या कंपनीने घेतला आहे. ही कंपनी कोल्हापूर जिल्ह्यातील ४५ ठिकाणी सबस्टेशन अंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प उभारणार असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून १७५ मेगावॅट वीज निर्मिती होईल
यावेळी बोलताना महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता परेश भागवत म्हणाले, ‘प्रदूषण विरहित असणाऱ्या या सौरऊर्जा प्रकल्पामधून तीन मेगावॅट वीज निर्मिती होईल. या प्रकल्पामधून शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या दोन्ही फेडरांना वीजपुरवठा केल्यामुळे शेतकऱ्यांना सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वीजपुरवठा होईल.
या प्रकल्पामुळे सुमारे आठ तास दिवसा वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे. इतर वीज प्रकल्प उभारणीसाठी लागणारा कालावधी पाहता सौरऊर्जा प्रकल्प लवकर कार्यान्वित होतात. भविष्यात सोलर वीज प्रकल्प मोठ्या प्रमाणात झाल्यास वीजदर नियंत्रण राहण्यास मदत होईल.’
माजी सरपंच दत्ता पाटील म्हणाले, ‘केनवडे येथे होणारा हा प्रकल्प शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प केनवडेत मंजूर करून आणता आला.’ या प्रकल्पामुळे केनवडे सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या केनवडेसह गोरंबे, म्हाकवे, आणूर, सावर्डे खुर्द, सावर्डे बुद्रुक, पिराचीवाडी तसेच नवीन वाढीव व्हनाळी, साके, शेंडूर या गावांतील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यावेळी मेघा इंजिनिअरिंगचे राजशेखर रेड्डी, गंगाधर श्रीवास्तव रेड्डी, हेमंत पाटील, आदी उपस्थित होते.
सौरऊर्जा प्रकल्प हे प्रदूषणमुक्त आहेतच, त्याचबरोबर अगदी कमी कालावधीत हे प्रकल्प पूर्णत्वास जातात. कोल्हापूर जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून १७५ मेगावॅट वीज निर्मितीसाठी ४५ सबस्टेशन अंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
- परेश भागवत, मुख्य अभियंता, कोल्हापूर परिमंडळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.