कोल्हापूर - थोरला दवाखाना म्हणून छत्रपती प्रमिलाराजे(सीपीआर) जिल्हा रुग्णालयाची ओळख जिल्हा भरातल्या शेवटच्या माणसाला आहे. गोर गरिबांना आधार ठरलेली ही वास्तू वेदनांना मुक्ती देते. खर तर कोणाला ही आजारपण येऊ नये, अशी इच्छा बाळगली तर हा वारसा जपावा कसे म्हणावं? पण आजार असो किंवा अपघात असो, या प्रसंगात हीच वास्तू धीर देत आली, यापुढेही देईल म्हणूनच तिचा परिचय करून घेतला पाहिजे आणि धार्मिक स्थळाप्रमाणेच ती जपली पाहिजे.
अल्बर्ट एडवर्ड नाव असलेल्या या हॉस्पिटलचा पायाभरणी समारंभ ९ मार्च १८८१ रोजी मुंबईचे गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन यांच्या हस्ते झाला. १८७५ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या भेटी प्रीत्यर्थ अल्बर्ट एडवर्ड असे नामकरण झाले.
१८८४ मध्ये तीन लाख रुपये खर्च करून गॉथिक शैलीतील पूर्ण झालेली ही इमारत मुंबई सरकारच्या रॉयल आर्किटेक्चर इंजिनिअर्सच्या मेजर मेण्ट यांच्या आराखड्याप्रमाणे पूर्ण केली. रामचंद्र महादेव आणि कंपनीने बांधकामाचे काँट्रॅक्ट घेतले होते. शेनोन हे स्टेटचे अभियंता आणि मार्तंड वामन शास्त्री हे त्यांचे सहायक होते.
बांधकाम बजेट तीन लाख पाच हजार चाळीस रुपये होते. यापैकी दोनशे सतावीस रुपये खर्च कमी झाला, अशी प्रामाणिक नोंद असलेले हे एकमेव बांधकाम दिसते. पुढे याच इमारतीला छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय असे नामकरण केले.
एखाद्या राजवाड्याची इमारत असावी, अशी ही इमारत, प्रशस्त दरवाजे, खिडक्या, व्हरांडा, जिने हे वास्तुचे वैशिष्ट्य अधोरेखित करतात.
१९३५ मध्ये साठ हजार रुपये खर्च करून किंग जार्ज पाचवा ज्युबिली वॉर्ड दोनशे रुग्ण क्षमतेचा बांधला. त्याचप्रमाणे पद्माराजे प्रसूती रुग्णालय याच परिसरात बांधले. शंभर रुग्णांची राहण्याची व स्त्री, पुरुष असे स्वतंत्र वॉर्डची सोय येथे केली. त्याशिवाय रेबीजवर मोफत लस, लहान मुलांना मोफत दूध, आहार व सल्ला देण्याबरोबरच दरबारचे सर्जनद्वारा लक्ष दिले जात होते. दोन सहायक सर्जन आणि एक स्त्री डॉक्टर, सहकारी, कर्मचारी अशी नेमणूक करून त्यांच्या निवास व्यवस्था केलेली होती. १९२६-२७ ला ५१ हजार रुपये खर्च या हॉस्पिटलसाठी झाल्याची नोंद दिसते. यावरून आरोग्याची काळजी घेण्यासाठी संस्थानची भूमिका स्पष्ट होते. १९०४ मध्ये सुरू झालेल्या स्त्री रुग्ण कक्षाची जबाबदारी डॉ. कृष्णाबाई केळवकर यांनी सांभाळली होती. काळाच्या ओघात गरज निर्माण होईल, तशी नव्या इमारतींची बांधकाम येथे होत गेली. ती मूळ वास्तूशी सुसंगत नाहीत. मूळ इमारतीतही अनेक बदल केले गेले. दर्शनी भाग मात्र सुस्थित आहे.
वारसा मूल्य जपण्याची गरज
अंतर्गत भागात टाईल्स, ऑईल पेंट याबाबी हॉस्पिटलची गरज म्हणून आवश्यक असल्या तरी त्यात तारतम्य ठेवण्याची गरज आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने अनेक धोके निर्माण झाले आहेत. स्वच्छता, पार्किग, सुरक्षा अशा बाबी कोलमडल्या आहेत. त्यांना योग्य ती शिस्त आणायला एक मास्टर प्लॅन करून त्याची अंमलबजावणी करताना वारसा मूल्य जपली पाहिजेत.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.