कळणे : राज्याचा उद्योगमंत्री असताना आडाळी एमआयडीसी मंजूर केली. शेतकऱ्यांनी वर्षभरात जमिनी महामंडळाला हस्तांतरीत केल्या; पण राज्य सरकारला येथे उद्योग आणता आले नाहीत. आता मी शेतकऱ्यांनाच सांगेन की जमिनी परत देण्याची मागणी करा, अशी खोचक टीका केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आडाळी येथे केली.
जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने राणे यांनी आज आडाळीला भेट दिली. येथील माऊली मंदिरात त्यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, विशाल परब, संतोष नांचे, सुधीर दळवी, सूर्या गवस आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, "नरेंद्र मोदी सरकारने जनहिताच्या अनेक योजना आणल्या. त्यांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी ही यात्रा आहे. आपण जे प्रेम देत आहात त्याने उत्साह वाढत आहे. माझ्या खात्याच्या माध्यमातून अनेक योजना आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. लवकरच राज्यात आमचे सरकार येईल, तेव्हा आडाळीत उद्योग आणले जातील.
येथील शेतकऱ्यांनी स्वतःहून जमिनी दिल्या. जनतेने सहकार्य करूनही राज्य सरकारला येथे उद्योग आणता आले नाहीत. एवढ्यात पाचशे कारखाने आडाळीत आणता आले असते. गोव्यात ये -जा करणाऱ्या शेकडो तरुणांना दिलासा मिळाला असता. मी मात्र येथे उद्योजक निर्माण करण्याचे नियोजन केले आहे."
दरेकर म्हणाले, "येथील जनतेने यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद देत नारायण राणे यांच्यावरचा विश्वास दाखवून दिला आहे. भविष्यात येथील एमआयडीसी त उद्योग येण्यासाठी निश्चितच प्रयत्न होतील." यावेळी सरपंच उल्का गांवकर, बूथ अध्यक्ष शैलेश गांवकर यांनी स्वागत केले.
केंद्रीय आयुष मंत्रालयच्या राष्ट्रीय वनौषधी संस्थेचा प्रकल्प आडाळीत मंजूर करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल प्रमोद जठार यांचा ग्रामस्थांच्यावतीने राणेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आडाळी, मोरगाव, कळणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.