कोल्हापूर: जुने वापरलेल्या कपड्यांचा पुनर्वापर अनेकजण करतात. काहीजण या कपड्यांपासून पडदे, कुशन कव्हर बनवितात तर, काहीजण त्याचा वापर फरशी, गाडी पुसण्यासाठी करतात. तरीही हे कापड फाटल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणात कचरा तयार होतोच. यावर पर्याय शोधत टेक्स्टाईल डिझायनर असलेल्या तेजल देशपांडे हिने जुन्या साड्या, कपडे, ब्लाऊजपीस, बेडशीट, पडद्यांचा पुनर्वापर करत विविध कलात्मक वस्तू तयार केल्या आहेत. पॉट कव्हर्स, लॅपटॉप बॅग, शॉपिंग बॅग, फुलदाणी यासोबतच इतरही कलात्मक असे शोपीस तिने विविध चिंध्यांच्या वापरातून बनविल्या आहेत. जुन्या कपड्यांच्या पुनर्वापरातून त्याच्या शाश्वत वापरासोबत पर्यावरणाचा समतोल साधण्याचा तिचा प्रयत्न आहे.
तेजल खरी कॉर्नर येथे राहते. ती सातवीमध्ये शिकत असताना तिच्या शिक्षिकांनी तिच्या कलात्मक वस्तूंतील आवड बघून तिला डिझायनिंग क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला. दहावीनंतर डिझायनिंगमधील करिअरच्या संधी कोणत्या आहेत, त्याचे शिक्षण कोठे मिळते, याची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून शोधली. बारावीनंतर अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (एनआयडी) मध्ये पदवीसाठी प्रवेश घेतला. पदवीच्या पहिल्या वर्षानंतर तिला टेक्स्टाईल डिझाईनमध्ये आपले कौशल्य असल्याचे जाणवले. तेथे कपड्यांच्या डिझायनिंगमधील विविध प्रकार ती शिकली. पुढे तमिळनाडू, कच्छ, बनारस, पश्चिम बंगाल, छत्तीसगड येथील पारंपरिक हॅंडलुम कलेचा अभ्यास केला. तेथील हस्तकलेतून विणले जाणारे कापड, त्याचा पुनर्वापर अशा अनेक बाबींचा अभ्यास करताना घरातील कचरा म्हणून बाहेर जाणाऱ्या कापडापासून नव्या कलात्मक वस्तू डिझाईन करता येईल, अशी कल्पना तिला सुचली.
पदवीचे शिक्षण पूर्ण होताच कॅंम्पस प्लेसमेंटमधून तिची बेंगलोर येथील एका नामांकित हॅंण्डलुम साड्या डिझाईन करणाऱ्या कंपनीत डिझायनर म्हणून निवड झाली. मोठे पॅकेज घेत एका मोठ्या ब्रॅंण्डशी ती जोडली गेली. मात्र नोकरी करत असताना तिचे मन अस्वस्थ होते. ज्या कोल्हापूरशी आपली नाळ जोडली गेली आहे त्या कोल्हापुरला आपल्या कौशल्याचा वापर व्हावा, हा विचार सतत मनात घोळत होता. ऑगस्ट २०२० मध्ये तिने मोठ्या पगाराची नोकरी सोडली. पुन्हा कोल्हापुरात येऊन महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. येथील काही महिलांना जुन्या कपड्यांपासून विविध कलात्मक वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षणही ती देत आहे.
हेही वाचा- 55 वर्षांची परंपरा असणारा माडग्याळी मेंढी बाजार संशोधन संवर्धन प्रस्ताव दप्तर दिरंगाईतच -
सिंथेटिक, सिल्क, नायलॉनचा पुनर्वापर
जुन्या कपड्यांचा वापर करताना अनेकजण कॉटन साडीपासून गोधडी, पडदे, पायपुसणी तयार करतात. मात्र सिंथेटिक, सिल्क, नायलॉन आदी प्रकारच्या कपड्यांचा पुनर्वापर करणे शक्य होत नाही. सर्वच प्रकारच्या कपड्यांचा पुर्नवापर करत तेजलने या विविध कलात्मक वस्तू साकारण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
लहानपणापासूनच मला हस्तकलेत आवड होती. कार्यानुभव मधील विविध कौशल्ये आत्मसात होती. बारावीनंतर डिझायनिंगमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्याची खोली कळाली. या कौशल्यातून चांगले उत्पन्न मिळवू शकतो, याची जाणीव झाल्यानंतर महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा, यासाठी प्रयत्न सुरू केले.
- तेजल देशपांडे
संपादन- अर्चना बनगे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.