07391
संग्रहित
निष्काळजीपणा ठरतोय जीवघेणा
शेतकऱ्यांचे प्रबोधन गरजेचे : सुरक्षित कीटकनाशक फवारणीकडे दुर्लक्ष
गणेश शिंदे : सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. २९ : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. असुरक्षित कीटकनाशकांची हाताळणी व फवारणी हे यामागील प्रमुख कारण आहे. कृषी विभागाने कीटकनाशक फवारणीबाबत केलेल्या सूचनांकडे शेतकरी, शेतमजुरांनी दुर्लक्ष केल्याचे या घटनांवरून स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात भाजीपाल्यासह इतर पिकांवर फवारणी करत असताना विषबाधा होऊन अनेक शेतकरी जीवास मुकले आहेत. बदलत्या वातावरणामुळे पिकांना कीटकनाशकांची गरज ओळखून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून फवारणी केली जाते. कीटकनाशके शरीरावर उडाल्यास किंवा पोटात गेल्यास विषबाधा होऊन शेतकऱ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची सुरक्षा व उपाययोजनांकडे होणारे दुर्लक्ष जीवावर बेतणारे ठरत आहे.
पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे जिल्ह्यात उसाबरोबरच भाजीपाला मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. प्रतिकूल वातावरण, पिकांवरील रोगराई टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फवारण्या करण्यात येतात. मात्र, ती सुरक्षित पद्धतीने केल्यास याचा शेतकऱ्यांना फटका बसणार नाही. मात्र, सध्या जिल्ह्यात फवारण्या करताना विषबाधा होऊन मृत्यूचे प्रमाण पाहिल्यास फवारणीच्या सूचनांकडे शेतकऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होते.
....
फवारणी करताना घ्यावयाची काळजी
प्लास्टिक बास्केटमध्ये पाणी घेऊन त्यात कीटकनाशक मोजून टाकावे
कीटकनाशक वापरण्यापूर्वी लेबल, माहितीपत्रक वाचून सूचना पाळाव्यात
फवारणी करताना संरक्षक कपडे, बूट, हातमोजे, मास्क वापरावा
फवारणी करताना धूम्रपान, तंबाखू सेवन करू नये
फवारणी झाल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत
कीड व परभक्षक कीटकांचे गुणोत्तर १:२ आल्यास रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी
वातावरणात आर्द्रता असल्यास जैविक कीटकनाशके प्रभावी ठरतात
त्यानंतरही किडीचे प्रमाण अधिक असल्यास रासायनिक कीटकनाशके फवारावीत
सर्वसाधारण रसशोषक किडीसाठी आंतरप्रवाही तर अळीवर्गीय किडीसाठी स्पर्शजन्य शिफारशीत कीटकनाशके निवडावीत
....
कीटकनाशकांसोबत संरक्षक किट नावालाच
कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा टाळण्यासाठी कंपन्यांनी कीटकनाशकासोबत संरक्षित किट देण्याचे शासनाने आदेशित केले होते. मात्र, याचे बहुतांश कंपन्याकडून पालन होताना दिसत नाही.
....
शेतकऱ्यांनी फवारणी करताना शक्यतो शांत वारे असेल त्याचवेळी करावी. फवारणी करताना सुरक्षा किट हे आवश्यकच आहे. कोणत्याही परिस्थितीत औषधाचा हाताशी व शरीराशी थेट संपर्क येणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
- अरुण भिंगारदेवे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.