कोल्हापूर महानगरपालिकेत पहिला मुस्लिम महापौर (Muslim Mayor) करण्याचे काम शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ‘मातोश्री’वरून केले.
कोल्हापूर : तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्या मंत्रालयातील दालनात कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी (Kolhapur Extension) बैठक झाली. तत्कालीन आमदार सुरेश साळोखे (Suresh Salokhe) हद्दवाढीसाठी आग्रही होते. यावेळी कॉ. गोविंद पानसरे, के. आर. आकोळकर, विष्णूपंत इंगवले, आदी बैठकीस उपस्थित होते. मुख्यमंत्री जोशी यांना हद्दवाढ करायची नव्हती. बैठकीत वातावरण तणावपूर्ण झाले.
अखेर विषय टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘मी नगरविकास सचिवांशी चर्चा करतो,’ असे सांगून विषय संपवला आणि त्याचवेळी इंगवले यांनी तुमच्या मागे नगरविकास सचिव बसले आहेत, असे सांगितले. यावर मुख्यमंत्री जोशी यांना काय बोलावे हे सुचेना झाले. ते मिश्कीलपणे म्हणाले, ‘मोरे.. अशा बैठकीत तुम्ही आणि मी एकाच ठिकाणी बसायचे नसते..’ आणि बैठकीत एकच हशा पिकला. ही हद्दवाढ होणार नाही हे सर्वांच्या लक्षात आले आणि ती बैठक संपली. तत्कालीन आमदार सुरेश साळोखे यांचे स्वीय सहायक सुनील जोशी यांनी या आठवणींना उजाळा दिला.
‘मी त्यावेळी जिल्हाप्रमुख होतो. आमदार साळोखे यांच्यासोबत मुंबईला येणे-जाणे होते. त्यातून मुख्यमंत्री जोशी मला ओळखू लागले. एकेदिवशी मी लिफ्टची वाट पाहत मंत्रालयात उभा होतो. त्यावेळी त्यांची नजर माझ्याकडे गेली आणि त्यांनी मला त्यांच्या लिफ्टमध्ये घेतले. त्यावेळी हा जिल्हाप्रमुख आहे, सर्वसामान्यांची कामे आणतो. तातडीने करत जा, अशा सूचना स्वीय सहायकाला दिल्या. मी मुख्यमंत्र्यांसोबत असल्याचे अनेकांनी पाहिले आणि पुढे मानसन्मान मिळू लागला. ‘कोल्हापूकरांना पाहिले की बरे वाटते’ असे म्हणून त्यांनी माझी पाठ थोपटली.. आजही तो क्षण आठवतो’, अशी आठवण तत्कालीन जिल्हाप्रमुख रवी चौगुले यांनी सांगितली.
मुख्यमंत्र्याच्या दालनात कोल्हापूरच्या पाणीप्रश्नी बैठक झाली. तत्पूर्वी, बैठकीत मुख्यमंत्री जोशी यांनी बोलावून घेतले. तांत्रिक बाबीतून योजना होणार नसल्याचे स्पष्ट केले. मी आग्रही राहिलो, तेव्हा बाहेर महापौर थांबले आहेत, त्यांना विचारू. ते काय म्हणतील तो निर्णय होईल, असे सांगितले. यावर मी होकार दिला. दहा मिनिटांत महापौरांसह कोल्हापूरचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी आले. त्यावेळी महापौरांनी शिंगणापूर योजना द्या, असे सांगितले आणि शिंगणापूर पाईपलाईन मंजूर झाली.
मात्र, काळम्मावाडी थेट पाईपलाईन पुन्हा होणार नाही, म्हणून आग्रह धरला आणि त्या शिंगणापूर योजनेला पहिला टप्पा म्हणून जाहीर केले. केवळ आपल्या कारकिर्दीत पाईपलाईन होईल, म्हणून काळम्मावाडी ऐवजी शिंगणापूर योजना मंजूर झाल्याचाही किस्सा माजी आमदार सुरेश साळोखे यांनी सांगितला. लोकसभेचे सभापती असताना कोल्हापूर रेल्वेस्थानकाला राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्यात त्यांचेही योगदान असल्याचेही साळोखे यांनी सांगितले.
कोल्हापूर महानगरपालिकेत पहिला मुस्लिम महापौर (Muslim Mayor) करण्याचे काम शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ‘मातोश्री’वरून केले. सुरेश साळोखे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर अकरा नगरसेवक उभे केले आणि कोल्हापुरात फरास महापौर झाले पाहिजेत, अशी आग्रही भूमिका घेतली. तेथून मुख्यमंत्र्यांनी सूत्रे हलविली आणि शिवसेनाप्रमुखांसमोर दिलेला शब्द खरा ठरला. बाबू फरास कोल्हापूरचे महापौर झाले आणि बिन आवाजाचा बॉम्ब फुटला, अशी चर्चा राज्यभर झाल्याचेही कार्यकर्ते आजही सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.